
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच टीम इंडियासमोवर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हे आव्हान भारतासाठी खूप मोठं होतं. कारण यापूर्वी या स्पर्धेत कधीच इतकं मोठं लक्ष्य गाठलं नव्हतं. पण संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर हे शक्य झालं. भारताने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने जुना हिशेबही चुकता केला आहे. भारताने 10 वर्षानंतर वेस्ट इंडिजला धावांचा पाठलाग करतान इंगा दाखवला आहे. यापूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केलं होतं.
2016 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. तसेच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी गमवून 192 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पण वेस्ट इंडिजने हे आव्हान 19.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. त्यामुळे भारताचं अंतिमं फेरीचं स्वप्न भंगलं होतं. आता भारताला उपांत्य इंग्लंडशी सामना करायचा आहे. 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. त्याचा वचपा काढण्याची संधी आहे.
भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत यापूर्वी कधीच 170 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. पण यावेळेस 196 धावांचा यशस्वी पाठलाग करत हा भ्रम मोडून काढला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या झाला आहे. यापूर्वी इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 230 धावा, दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध 206, अमेरिकेने कॅनडाविरुद्ध 195 आणि वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 193 धावांचा पाठलाग केला होता.
भारताने सहाव्यांदा उपांत्य फेरी गाठत इंग्लंड आणि पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने 2007, 2014, 2016, 2022, 2024 आणि 2026 वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. तर पाकिस्तानने 2007, 2009, 2010, 2012, 2021, 2022 आणि इंग्लंडने 2010, 2016, 2021, 2022, 2024, 2026 मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला कोलकात्याच्या मैदानात पाचव्यांदा पराभूत केलं आहे. तर भारताने आयर्लंडला मालहिडे मैदानात सहावेळा पराभूत केलं आहे.
संजू सॅमसन हा सुरेश रैनानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. सुरेश रैनाने 2010 मध्ये 101 धावा केल्या होत्या. तर आता संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची खेळी केली आहे.