AUS vs IND : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? कॅप्टन सूर्या म्हणाला..

Suryakumar Yadav On T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या तयारीसाठी आता टीम इंडियाकडे फक्त 10 सामनेच आहेत. त्याआधी कॅप्टन सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या निवडीवरुन काय म्हटलं? जाणून घ्या.

AUS vs IND : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? कॅप्टन सूर्या म्हणाला..
Suryakumar Yadav On T20i World Cup 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 08, 2025 | 10:38 PM

भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावं लागलं. मात्र सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने टी 20I सीरिजमध्ये एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. भारताने टी 20I मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. तसेच या विजयासह भारताने टी 20I क्रिकेटमध्ये आपण गतविजेता का आहोत? हे दाखवून दिलं. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे गतविजेत्या भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. तसेच खेळाडूंची कामगिरी पाहता टीम इंडियाच टी 20I वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार आहे.

आगामी टी 20I वर्ल्ड कप आणि टीम इंडिया

वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेला बराच कालावधी शेष आहे. मात्र त्याआधी सर्व 20 संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडिया टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेआधी 2 मालिका खेळणार आहेत. त्यामुळे या टी 20I स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळेल? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. या मुद्दयावरुन कर्णधार सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पाचवा आणि अंतिम सामना रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

आगामी 2 मालिकांमधून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम निश्चित होईल, असं सूर्याने म्हटलं. भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धा होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी टीम इंडियाने सुरुवात केली आहे. टीम मनेजेमेंटकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. सूर्याने पाचव्या सामन्यानंतर काय म्हटलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीममध्ये सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका माहित आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडीच्या हिशोबाने ही चांगली डोकेदुखी आहे, असं सूर्याला वाटतं.

कॅप्टन सूर्याने काय म्हटलं?

टीम इंडियाने पिछाडीवर पडल्यानंतर कमबॅक करत सीरिज जिंकली. सूर्याने या कामगिरीचं श्रेय सर्व खेळाडूंना दिलं. “पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर कमबॅकचं श्रेय हे सर्व खेळाडूंचं आहे. गोलंदाज, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना त्यांची भूमिका माहित आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि फिरकीपटू चांगली कामगिरी करत आहेत. ते योजना आखतात आणि त्यानुसार कायम करतात, जे आपल्याला अपेक्षित आहे”, असं सूर्याने नमूद केलं.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडण्याबाबत सूर्याने ही चांगली डोकेदुखी असल्याचं म्हटलं. “आम्हाला 2-3 मालिका खेळायच्या आहेत. त्या मालिकांमधून आमची तयारी होईल. वुमन्स टीम इंडियाने नुकताच वर्ल्ड कप जिंकला आहे. घरात (भारतात) फार उत्साह आहे”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

दरम्यान टीम इंडिया टी 20I वर्ल्ड कपआधी 2 मालिकांमध्ये एकूण 10 सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध 9 ते 19 डिसेंबर दरम्यान 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 21 ते 31 जानेवारी दरम्यान 5 टी 20 सामने होणार आहेत.