
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने 2026 या वर्षात अप्रतिम सुरुवात केली आहे. अभिषेक शर्मा याने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. अभिषेकने या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने या अर्धशतकी खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरण्यासह मोठा कारनामा केला आहे. अभिषेकने त्याचा गुरु आणि भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताकडून अभिषेक आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र न्यूझीलंडने भारताला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. न्यूझीलंडने संजू सॅमसन आणि त्यानंतर इशान किशन या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. संजूने 10 तर इशानने 8 धावा केल्या. त्यामुळे भारताची 2.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 27 अशी स्थिती झाली. त्यानंतर अभिषेकने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरला.
अभिषेक आणि सूर्या या दोघांनी दोन्ही बाजूने फटकेबाजी करुन धावांची भरपाई केली आणि भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. अभिषेकने या दरम्यान ग्लेन फिलिप्स याने टाकलेल्या आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक झळकावलं. अभिषेक यासह 2026 मध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने अर्धशतकापर्यंत पोहचण्यासाठी अवघ्या 22 चेंडूंचा सामना केला. अभिषेकच्या टी 20i कारकीर्दीतील हे सातवं अर्धशतक ठरलं. अभिषेकने 227.27 च्या स्ट्राईक रेटने 22 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. अभिषेकने या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले.
अभिषेकची फायर खेळी
A fiery FIFTY 🔥
7⃣th in T20Is for Abhishek Sharma 👏
He is looking in great touch tonight 👌
Updates ▶️ https://t.co/ItzV352h5X#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sKBaApHjtp
— BCCI (@BCCI) January 21, 2026
अभिषेकने या खेळीदरम्यान युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला. अभिषेकने युवराजला टी 20i मधील षटकारांबाबत मागे टाकलं. युवराजला मागे टाकण्यासाठी अभिषेकला या सामन्याआधी 2 षटकारांची गरज होती. अभिषेकने कायल जेमिसन याने टाकलेल्या पाचव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स लगावला. यासह अभिषेकने युवराजला टी 20i सिक्सबाबत मागे टाकलं. अभिषेक शर्मा याने 34 टी 20i सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर युवराजने 58 सामन्यांमध्ये 74 षटकार लगावले होते.