
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चौथ्या आणि निर्णायक टी 20I सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. भारताने क्वीसलँडमधील कॅरारा ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात केली. भारताचा हा या मालिकेतील सलग आणि दुसरा विजय ठरला. भारताने विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. भारतान या विजयासह मालिका गमावणार नाही हे निश्चित केलं. तसेच भारताला या विजयामुळे आता मालिका विजयाची संधी निर्माण झाली आहे.
टीम इंडियाने या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली. भारतासाठी आधी अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. तसेच दोघांनीच सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी कांगारुंना आपल्या जाळ्यात अडकवलं. फिरकी गोलंदाजांना अर्शदीप सिंह, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी चांगली साथ दिली. कॅप्टन सूर्या सलग दुसर्या विजयानंतर फार आनंदी होता. सूर्याने या विजयाचं श्रेयस संघाला दिलं. मात्र त्याने 2 खेळाडूंचा विशेष उल्लेख केला. सूर्या काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
कॅप्टन सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने चांगली सुरुवात मिळवून दिल्याचं म्हटलं. या सुरुवातीमुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावासंख्येपर्यंत पोहचता आल्याचं सूर्याने नमूद केलं.
“सर्व फलंदाजाना या विजयाचं श्रेय जातं, विशेष करुन अभिषेक आणि शुबमनला. त्या दोघांनी पावरप्लेमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली ते फार चांगलं होतं. या खेळपट्टीवर 200 पेक्षा अधिक धावा होणार नाहीत, हे त्या दोघांनी आधीच हेरलं”, असं सूर्याने म्हटलं. “प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं. फलंदाजांनी पूर्ण जोर लावला”, असं सूर्याने स्पष्ट केलं.
सूर्याने फलंदाजांनंतर गोलंदाजांचंही कौतुक केलं. गोलंदाजांनी परिस्थिती ओळखली. त्यांनी परिस्थितीशीही एकरुप होत बॉलिंग केली. आमच्याकडे 2-3 ओव्हर टाकू शकतील, असे गोलंदाज आहेत, हे आमचं वैशिष्ट्य आहे. तसेच गरज पडल्यास ते संपूर्ण 4 ओव्हर टाकू शकतात”, असं म्हणत सूर्याने गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक करत त्यांच्यावर विश्वास असल्याचं बोलून दाखवलं.