‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…’, हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशारा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पण गौतम गंभीर यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही..., हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशारा
'टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही...', हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशारा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 10, 2025 | 3:54 PM

भारताचा टी20 वर्ल्डकप दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका भारताने 2-1 ने जिंकली. आता दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिके खेळण्यास सज्ज आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी या दोन मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहेत. कारण या मालिकेतूनच खेळाडूंची टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा तीन महिन्यांनी भारतात होणार आहे. मागच्या पर्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा वर्ल्डकप भारतात होणार असल्याने जेतेपदासाठी फेव्हरेट मानला जात आहे. पण असं असताना क्रीडाप्रेमींची हेड कोच गौतम गंभीरच्या वक्तव्याने धाकधूक वाढली आहे. गौतम गंभीरच्या मते, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम पूर्णपणे तयार नाही. त्यांच्या या वक्तव्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

बीसीसीआयसोबत बोलताना हेड कोच गौतम गंभीर यांनी मन की बात सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की, ‘ही एक अतिशय पारदर्शक ड्रेसिंग रूम आहे, एक अतिशय प्रामाणिक ड्रेसिंग रूम आहे आणि आम्हाला ती तशीच हवी आहे. मला वाटते की टी20 विश्वचषकापर्यंत आम्ही जिथे पोहोचू इच्छितो तिथे पोहोचलो नाही. आशा आहे की, खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याचे महत्त्व समजेल. आम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला अजूनही तीन महिने आहेत.’ गौतम गंभीर यांच्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की टीम इंडियाला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. तर आणि तरच टीम इंडिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवू शकेल.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघा टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 31 जानेवारीला संपेल. त्यानंतर टीम इंडिया थेट फेब्रुवारी महिन्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार यात काही शंका नाही. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव भासणार आहे. ही उणीव आता शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांना भरून काढावी लागणार आहे. गोलंदाजीवरही आणखी लक्ष द्यावं लागणार आहे.