
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाचवा आणि अंतिम सामना जिंकला. भारताने या विजयासह ही मालिका 3-1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता बुधवारी 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा (Vijay Hazare Trophy 2025-26) थरार रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही टीम इंडियाची स्टार आणि अनुभवी जोडीही खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेची उत्सूकता लागून आहे. या निमित्ताने रोहित आणि विराट या दोघांनी या स्पर्धेत किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
विराट आणि रोहित दोघेही गेली अनेक वर्ष सातत्याने टीम इंडियासाठी खेळले. तसेच दोघांनी नेतृत्व केलं. त्यामुळे या दोघांना या स्पर्धेत खेळता आलं नाही. मात्र आता टी 20i आणि कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर हे दोघे खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. रोहित या स्पर्धेत 7 वर्षांआधी तर विराट 15 वर्षांआधी खेळला होता. या स्पर्धेत या दोघांची आकडेवारी कशी राहिलीय? जाणून घेऊयात.
रोहितने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा सामना हा 2018 साली खेळला होता. रोहितने या स्पर्धेत आतापर्यंत 18 सामन्यांमधील 17 डावांत 38.7 च्या सरासरीने 581 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराटने रोहितच्या तुलनेत कमी सामने खेळलेत. मात्र विराटने रोहितपेक्षा अधिक धावा केल्यात. विराटने 13 सामन्यांमध्ये 68.25 च्या अप्रतिम सरासरीसह एकूण 819 धावा केल्या आहेत. विराटने 106.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा कुटल्यात. विराटने या स्पर्धेत 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
रोहित देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतो हे चाहत्यांना माहितच आहे. रोहित या स्पर्धेत ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर विराट कोहली ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्लीचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र रोहित आणि विराट हे दोघेही या स्पर्धेतील सर्व सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. टीम इंडिया 11 जानेवारीपासून मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे ही अनुभवी जोडी या स्पर्धेतील सर्व सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे.