WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत बाद फेरीसाठी चुरस वाढली, आरसीबीचं ठरलं पण…

वुमन्स प्रीमियर लीग 2026 आता रंगतदार वळणावर आली आहे. 13 सामन्यांचा खेळ संपला असून आता साखळी फेरीतील फक्त 7 सामने शिल्लक आहेत. त्यात आरसीबी बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. पण दोन संघांचं गणित मात्र विचित्र झालं आहे.

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत बाद फेरीसाठी चुरस वाढली, आरसीबीचं ठरलं पण...
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत बाद फेरीसाठी चुरस वाढली, आरसीबीचं ठरलं पण...
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Jan 21, 2026 | 6:00 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर रंगत वाढत आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 8 सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सने 6 सामने खेळले आहे. तर उर्वरित चार संघांनी प्रत्येक 5 सामने खेळले असून 2 सामने शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला. तसेच 10 गुणांसह बाद फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. कारण इतर संघांनी 10 गुण केले तरी आरसीबीचा नेट रनरेट हा +1.882 इतका आहे. त्यामुळे आरसीबी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरली आहे. आता आरसीबीने आणखी एक सामना जिंकला तर थेट अंतिम फेरी गाठणार आहे. कारण सध्याची गुणतालिकेतील स्थिती पाहता कोणताही संघ 12 गुण करू शकणार नाही. त्यात आरसीबीकडे तीन सामने आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की झालं. त्यामुळे आरसीबीचं अंतिम फेरीचं गणित जुळणार आहे.

दरम्यान, एलिमिनेटर फेरीसाठी चार संघात चुरस निर्माण झाली आहे. या शर्यतीत मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आहेत. या चारही संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. त्यामुळे चारही संघ या शर्यतीत आहेत.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून दोन सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात 4 गुण असून नेट रनरेट हा +0.046 इतका आहे. मुंबईचा पुढचे दोन सामने आरसीबी आणि गुजरात जायंट्ससोबत आहेत. मुंबईने पुढचे दोन सामने जिंकले तरी पारड्यात 8 गुण पडतील. त्यामुळे इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागेल.

यूपी वॉरियर्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यात दोन सामने जिंकले असून तीन सामन्यात पराभव झाला आहे. 4 गुण आणि -0.483 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. पुढचे तीन सामने गुजरात जायंट्स, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहेत. उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर एलिमिनेटर फेरीत स्थान पक्कं होईल.

दिल्ली कॅपिटल्सही पाच सामने खेळली असून 4 गुण आणि -0.586 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तीन सामने आरसीबी, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स विरुद्ध आहेत. दिल्ली कॅपिटल्सचं गणितही पुढच्या तीन सामन्यांवर अवलंबून आहे. तीन सामन्यात विजय मिळवताच स्थान पक्कं होईल.

गुजरात जायंट्सचं गणितही दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्ससारखं आहे. गुजरात जायंट्सचे 4 गुण असून नेट रनरेट -0.864 आहे. यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. गुजरात जायंट्सला एलिमिनेटरची संधी आहे. कारण शर्यतीत असलेल्या तिन्ही संघासोबत त्यांचा सामना होणार आहे. त्यामुळे त्यांची पतंग गुजरातच्या हाती आहे.