
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा डिसेंबर महिन्यातच करण्यात आली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या घोषणेनंतर शुबमन गिलला डावलल्याची चर्चा सर्वाधिक रंगली. कारण त्याच्याकडे टी20 संघाचं उपकर्णधारपद होतं. त्यानंतर शुबमन गिलने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण आणखी एक खेळाडू असा होता की त्याला न सांगताच संघातून बाहेर काढलं गेलं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा आहे. संघातून डावलल्यानंतर जितेश शर्माने आता कुठे खुलासा केला आहे. जितेश शर्माने सांगितलं की, त्याला संघातून काढलं गेलं आणि घोषणा झाल्याचं मीडियाच्या माध्यमातून कळलं.
डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकाच संघाची घोषणा केली गेली. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, बीसीसीआय सेक्रेटरी देवजित सैकिया आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करण्यात आली. संघात निवड झाली नाही हे जितेश शर्माला अजिबात माहिती नव्हतं. निवडकर्त्यांनी त्याला याबाबत काहीच कळवलं नव्हतं. क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत जितेश शर्माने सांगितलं की, ‘संघाची घोषणा होईपर्यंत संघातून बाहे काढलं आहे याची माहिती नव्हती. पत्रकार परिषदेत निवडकर्त्यांनी संघातून डावलण्याचं कारण सांगितलं. मी सहमत होतो आणि ते योग्य कारण आहे.’
प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर जितेश शर्माशी संपर्क साधला. त्याबाबत जितेश शर्माने सांगितलं की, ‘यानंतर मी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांसोबत चर्चा केली होती. मला वाटलं की योग्य कारण आहे. जे काही त्यांना समजवायचं होतं ते मला योग्य रितीने समजलं. मी त्यांच्याशी सहमत आहे.’ जितेश शर्माच्या जागी संघात इशान किशनची एन्ट्री झाली आहे. अजित आगरकरने त्याची निवड करताना सांगितलं की, टीम व्यवस्थापनाला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेटकीपर फलंदाज हवा होता. त्यामुळे गिलच्या जागी संजू सॅमसनची निवड झाली आहे. तर दुसरा विकेटकीपर म्हणून जितेश शर्माऐवजी इशानला पसंती दिली गेली. जितेश शर्मा फिनिशरची भूमिका बजावतो. पण त्याची जागा रिंकु सिंहचा समावेश केला गेला आहे.