Asia Cup 2023 : आशिया चषकात डेब्यू करण्याबाबत तिलक वर्मा याने स्वत:च केला खुलासा, म्हणाला..
आशिया कप 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाची घोषणा झाली असून वनडे स्क्वॉडमध्ये तिलक वर्माला स्थान मिळालं आहे. आता निवडीनंतर तिलक वर्माने खुलासा केला आहे.

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 17 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यात वनडे स्क्वॉडमध्ये पहिल्यांदाच तिलक वर्मा याची निवड झाली आहे. तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेत डेब्यू केलं होतं. यात मालिकेत त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याची ही कामगिरी पाहून त्याची संघात निवड करण्यात आली आहे. आता तिलक वर्मा याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना तिलक वर्मा याने आपल्या डेब्यूबाबत स्वत:च सांगितलं आहे. बीसीसीआयकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आशिया कप स्पर्धेत डेब्यू करणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या तिलक वर्मा आयर्लंड दौऱ्यावर असून टी20 खेळत आहे.
तिलक वर्मा याने सांगितलं की, “मला कधीच वाटलं नव्हतं की मी आशिया कपमध्ये डेब्यू करे. माझं कायम स्वप्न होतं की टीम इंडियासाठी वनडेत डेब्यू करावं. मी नुकतंच टी20 मध्ये डेब्यू केलं आहे आणि पुढच्या महिन्यात आशिया कपसाठी टीममध्ये स्थान मिळालं आहे. हे एक स्वप्न आहे आणि मी यासाठी तयारी करत आहे.”, असं तिलक वर्मा याने सांगितलं.
🗣️🗣️ I want to do well and I'm pretty confident playing one day cricket.@TilakV9 describes his feelings after getting selected for #AsiaCup2023 👌👌 – By @RajalArora #TeamIndia pic.twitter.com/79A85QGcug
— BCCI (@BCCI) August 22, 2023
वनडे स्पर्धेत चांगली कामगिरी करणार
तिलक वर्मा याने सांगितलं की, “वनडे क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करेल असा विश्वास आहे. वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. लिस्ट ए मध्ये मी चांगलं प्रदर्शन केलं आहे त्यामुळे या फॉर्मेटमध्ये स्वत:वर विश्वास आहे.” तिलक वर्मा याने लिस्ट ए मध्ये खेळलेल्या 25 सामन्यात 5 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली आहे. सरासरी 56 हून जास्त आहे. त्यामुळे तिलक वर्माकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
तिलक वर्मा डेब्यू करणार तर कोणाला बसवणार
तिलक वर्मा आशिया कप स्पर्धेत डेब्यू करणार असेल तर कोणाला बसवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण चौथ्या स्थानासाठी श्रेयस अय्यर खेळणं जवळपास निश्चित आहे. तर केएल राहुल हा विकेटकीपर बॅट्समन म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल. इशान किशनलाही संघात स्थान मिळेल. मग तिलक वर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार तर कोणाच्या जागेवर असा प्रश्न उपस्थित होत आहे.
