Team india Dressing Room : दाऊदची ऑफर, धोनीला बिहारी बोलण्यापासून ते विराट पाया पडेपर्यंतचे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील टॉप 10 किस्से
क्रिकेटमध्ये मैदानात जे काही घडतं ते आपण सर्वजण पाहतो. मात्र पडद्यामागेसुद्धा खूप घडामोडी घडत असतात. टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक किस्से घडतात. ज्याबद्दल फक्त खेळाडूंनाच माहिती असते. या किस्स्यांबद्दल एखाद्या खेळाडूच्या मुलाखतीमध्ये किंवा आत्मचरित्रांमध्ये माहिती समोर येते. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येसुद्धा असे अनेक किस्से आहेत ज्याची फार काही चर्चा झाली नाही ना ते कधी समोर आले, याबद्दल जाणून घ्या.
1971 मध्ये वर्ल्ड प्लेइंग आणि ऑस्ट्रलियामध्ये सामना होता. या टीममध्ये फारुख इंजिनियर आणि सुनील गावसकर यांची निवड झाली होती. मेलबर्नच्या मैदानावर सामना होता. सुनील गावसकर टीम इंडियामध्ये नवीनच होते तर फारुख इंजिनियर हे त्यांचे सीनिअर होते. गावसकर खेळण्यासाठी मैदानात जात असताना त्यांना शून्यावर आऊट होऊन येऊ नको. कारण मेलबर्नचे पॅव्हेलियन दूर आहे असा सल्ला इंजिनियर यांनी दिला. पण झालं असं की त्या सामन्यामध्ये फारुख इंजिनियरच हेच शून्यावर आऊट झाले होते.
1986 मध्ये भारत आणि पााकिस्तानचा सामना शारजाहमध्ये होणार होता. या सामन्याआधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना ऑफर दिली होती. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान संघाचा पराभव केल्यावर सर्व क्रिकेटपटूंना कार भेट देईल, अशी ऑफर दिली होती. त्यावेळी कॅप्टन कपिल देव त्याच्यावर संतापला होता. त्याने दाऊदला तिथून निघून जायला सांगितलं होतं. या ऑफरबाबत दिलीप वेंगसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता.
2000 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली याने युवराज सिंहसोबत थट्टा केली होती. मात्र या थट्टेमुळे युवी रात्रभर झोपला नव्हता. गांगुलीने सामन्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे रात्री युवराजा तू ओपन करशील का? असं विचारलं होतं. यावर युवीनेही होकार दिला. पण युवी गोंधळून गेला, त्यामुळे रात्रभर अस्वस्थ झाला होता. सामना सुरू झाला आणि युवीने पॅडअप केलं. तर त्यावेळी त्याला समजलं की दादाने त्याची चेष्टा केली होती.
2002 मध्ये इंग्लंडमधील नॅटवेस्ट ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे कोच वीरेंद्र सेहवागवर भडकले होते. ते कोच दुसरे तिसरे कोणी नसून शांत स्वभाव म्हणून ओळखले जाणारे जॉन राईट होते. वीरेंद्र सेंहवाग चुकीचा फटका खेळून ड्रेसिंग रूममध्ये माघारी परतला. त्यावेळी कोच जॉन राईट यांनी सेहवागची कॉलर पकडली. पुन्हा जर असा आऊट झाला तर टीममधून बाहेर काढेल, अशी धमकी दिली.
2003 वर्ल्ड कपची फायनल सर्वांनाच माहिती आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या करा किंवा मरोचा सामना होता. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 359 धावांचे टार्गेट टीम इंडियाला दिले होते. त्यावेळी 300 धावांचा टप्पा पार करणे म्हणजे सामना जिंकल्यासारखं होतं. त्यामुळे टीममधील सगळेच खेळाडू घाबरले होते. तेव्हा भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ड्रेसिंग रूममध्ये हिंमत वाढवणार भाषण करत सर्वांचा आत्मविश्वास वाढवला होता. आपण प्रत्येक षटकात चौकार मारू शकतो का? जर होय असेल तर आम्ही 50 चेंडूत 200 धावा सहज करू. सचिनने नंतर समालोचक हर्षा भोगले यांना ही गोष्ट सांगितली. मात्र हा सामना जिंकण्यात भारताला यश आले नाही.
2005 मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेवेळी मोठा राडा पाहायला मिळाला होता. टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीसोबत टीममधील सर्वांना चेष्टा केली होती. मात्र गमतीत केलेली चेष्टा खूप महागात पडली होती. कारण त्यावेळी दादाने आपण कॅप्टन्सी सोडून देऊ असं म्हटलं होतं. गांगुलीने सर्व खेळाडूंची तक्रार केली असा खोटा आरोप त्याच्यावर केला गेला. दादा आल्यावर टीममधील सर्व खेळाडूंनी त्याला घेरलं. सगळेजण याबाबत विचारू लागले, दादाने हे खोटे असून मी कॅप्टन्सी सोडतो असं म्हणलेलं. या सगळ्याचा मास्टरमाईंड हरभजन सिंह होता. राहुल द्रविडने या प्रकरणाचा खुलासा करत दादाला १ एप्रिलला फसवल्याचं सांगितलं होतं.
2007 मध्ये टीम इंडियाचा बांगलादेशने पराभव करत बाहेर काढलं होतं. या पराभवामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. 2003 ला फायनल गाठणारी टीम इंडिया लाजिरवाण्या पराभवासह बाहेर पडली होती. त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती झाली होती की खेळाडूंचे पोस्टर चाहत्यांनी जाळले होते. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याला सचिन तेंडुलकर याने विचारलं की, मुनाफ तुला भारतामध्ये परत जायला भीती वाटत आहे का? यावर बोलताना, पाजी, मी ज्या ठिकाणी राहतो तिथे आठ हजार लोकं राहतात, तीच माझी सुरक्षा असल्याचं मुनाफ पटेल म्हणाला होता.
या काळातच टीम इंडियामध्ये महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली होती. त्यावेळी टीममध्ये बरेच सीनिअर खेळाडू होते. धोनीला यामधील अनेक खेळाडू बिहारी असं म्हणून त्याची खेचायचे. यामध्ये युवराज सिंह हा आघाडीवर असायचा. तुझ्या मोठ्या खेळीने टीम जिंकत नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. त्यानंतर धोनीने वन डे क्रिकेटमध्ये अनेक सामने त्याच्या एकट्याच्या दमावर जिंकवले. त्यानंतरही युवराज धोनीला हिणवायचा. ती म्हणजे धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत: ला सिद्ध करायला हवं. शेवटी धोनीने युवराजला विचारलं की, तू मला कायम का त्रास देतोस? यानंतर दोघे एकमेकांचे चांगले मित्रही झाले.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याचाही एक खास किस्सा आहे. विराट सुरूवातील टीममध्ये आला होता तेव्हा त्याच्यासोबतही खतरनाक प्रकार घडला. कोहली टीममध्ये आल्यावर त्याला सर्वांनी सांगितलं की सचिन तेंडुलकरच्या पाया पडावं लागतं. साहजिक आहे, क्रिकेटचा देव म्हणून ओळख मिळालेल्या सचिनसोबत खेळायचं म्हणजे कोणालाही खरच वाटण्यासारखं होतं. ड्रेसिंग रूममध्ये विराटने जाऊन सचिनच्या पायांना स्पर्श केला. त्यावेळी सगळेजण हसू लागले. पण विराटनेही त्याच सचिनच्या वन डे मधील शतकांचा विक्रम मोडला आहे. सचिननंतर दिग्गज खेळाडू कोण तर विराट कोहलीचे नाव घेतले जाते. आता झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर त्याने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
टीम इंडियाचा कुठेही सामना असूद्यात त्याल गर्दी होणार म्हणजे होणार यात काही शंका नाही. आपल्या जीवापेक्षा क्रिकेटसह खेळाडूंवर जीवापाड प्रेम करणारे अनेक चाहते आपण पाहिले असतील. आताही टीम इंडियाचा सामना असल्यावर एक चाहता तिरंग्याचे सर्व रंग त्याच्या शरीरावर दिसतात. मिस यू तेंडुलकर असं त्यावर लिहिलेलं असतं. हा अवलिया सचिन तेंडुलकरचा चाहता असून त्याचे नाव सुधीर कुमार चौधरी एक आहे. सचिनसह टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी सुधीर आताही दिसतो. सचिन खेळत असताना तो कायम आपल्याला जास्त दिसायचा. 2011 च्या वर्ल्ड कपमधील विजयानंतर सचिनने त्याला ट्रॉफीसोबत फोटो काढण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते.