
इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफ सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यावर्षीच्या आयपीएल लिलावाद्वारे संघात निवड झालेल्या दोन खेळाडूंनी संघ सोडला आहे. त्यांच्या जागी आणखी दोघे खेळाडू संघात सामील झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २ सामने खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी मायदेशी परतला आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी एनगिडीने आयपीएल मध्येच सोडली. यावेळी आरसीबीकडून लुंगी एनगिडीने एकूण 8 षटके टाकली. तसेच 4 विकेट घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. तर दोन सामन्यात दोन सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करणारा जेकब बेथेल देखील मायदेशी परतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी बेथेलला इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. आरसीबीकडून दोन सामने खेळणाऱ्या बेथेलने एका अर्धशतकासह एकूण 67 धावा केल्या.
आरसीबीचे दोन खेळाडू मायदेशी गेले असले तरी दिग्गज गोलंदाज जोश हेझलवूड मात्र परतला आहे. खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून आरसीबीसाठी सरावही सुरु केला आहे. त्याने 10 सामन्यात 36.5 षटकं टाकून 18 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या आगमनाने आरसीबीच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. तर बेथेलच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टिम सेफर्टची निवड केली आहे. दुसरीकडे, लुंगी एनगिडीच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीची याची निवड केली आहे.
दरम्यान, टि डेव्हिड दुखापतग्रस्त असल्याने आरसीबीची डोकेदुखी वाढली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना क्षेत्ररक्षणावेळी टिम डेव्हिडला दुखापत झाली होती. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात टिम डेव्हिडच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील विजयानंतर टॉप 2 मधील स्थान निश्चित होणार आहे. अशा स्थितीत प्लेइंग 11 मधील उलथापालथ आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकते.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग 11 : फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल