
क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. या 3 संघांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा समावेश आहे. तर आता एका जागेसाठी 2 संघांमध्ये चुरस आहे. उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ कोणता असणार हे? हे रविवारी 1 फेब्रुवारीला ठरणार आहे. रविवारी या एका जागेसाठी 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं पॅकअप होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना आर या पार असा आहे. या निमित्ताने या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 1 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथे खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
अंडर 19 टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात साखळी फेरीत यूएई, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर भारताने सुपर 6 फेरीत झिंबाब्वेला लोळवलं. आता टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तानला फक्त जिंकून जमणार नाही
तसेच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी विजयी होणं इतकंच गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी फक्त जिंकून चालणार नाही. टीम इंडियाचा नेट रनरेट हा पाकिस्तानपेक्षा भारी आहे. त्यामुळे पाकिस्तानला टीम इंडिया विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. अशात पाकिस्तानचा भारतासमोर चांगलाच कस लागणार आहे.