UAE vs NZ | T20I क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर, यूएईची ऐतिहासिक कामगिरी, न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात
United Arab Emirates vs New Zealand 2nd T20I | यूएईने कॅप्टन मुहम्मद वसीम याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला.

दुबई | क्रिकेट विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही. तसंच काही शनिवारी 19 ऑगस्टला पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघाला लिंबुटिंबु समजून गृहित धरणं किती महागात पडतं, हे न्यूझीलंडला चांगलंच समजलं असेल. सध्या न्यूझीलंड यूएई दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडने दौऱ्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना 19 धावांनी जिंकला. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र यूएईने इंगा दाखवत मोठा उलटफेर केला. यूएईने न्यूझीलंडचा दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने धुव्वा उडवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
सामन्याचा धावता आढावा
यूएईने टॉस जिंकला. कॅप्टन मुहम्मद वसीम याने बॉलिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 142 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फक्त तिघांनाच 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमॅन याने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर चाड बोवेस आणि जेम्स निशाम या दोघांनी प्रत्येकी 21 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही.
यूएईकडून आयान खाने याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मुहम्मद जवादुल्लाहने न्यूझीलंडच्या दोघांना माघारी पाठवलं. तर अलि नासिर, झहूर खान आणि मोहम्मद फराझुद्दीन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.
यूएईची 143 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर अर्यांश शर्मा झिरोवर कॅच आऊट झाला. त्यानंतर वृत्य अरविंद 25 धावांवर माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन मुहम्मद वसीम आणि आसिफ खान या तिघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन यूएईचा डाव सावरला आणि विजयाच्या आशा कायम ठेवल्या. दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी झाली. मात्र मिचेल सँटनर याने ही जोडी फोडून काढली. सँटनरने वसीमला 55 धावांवर आऊट केलं. वसीमने झंझावाती अर्धशतक ठोकलं. वसीमने 29 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 55 रन्स केल्या.
त्यानंतर आसिफ खान आणि बासिल हमीद या जोडीने यूएईला विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली आणि यूएईला विजय केलं. यूएईने 15.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 144 धावा केल्या. आसिफ खान याने नॉट आऊट 48 रन्स केल्या. तर बासिल 12 धावांवर नाबाद परतला. न्यूझीलंडकडून कॅप्टन टीम साऊथी, मिचेल सँटनर आणि कायले जेमिन्सन या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
यूएईचा ऐतिहासिक विजय
The match summary – one HISTORIC night at the Dubai International Stadium 😍🇦🇪 pic.twitter.com/r864wDpSGB
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) August 19, 2023
दरम्यान मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हा आज (20 ऑगस्ट) पार पडणार आहे. त्यामुळे कोणती टीम सामन्यासह मालिका जिंकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यूएई प्लेईंग इलेव्हन | मुहम्मद वसीम (कॅप्टन), आर्यांश शर्मा (विकेटकीपर), वृत्य अरविंद, आसिफ खान, अंश टंडन, बासिल हमीद, अली नसीर, आयान अफझल खान, मोहम्मद फराजुद्दीन, मुहम्मद जवादुल्लाह आणि झहूर खान.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | टीम साउथी (कर्णधार), चाड बोवेस, टिम सेफर्ट, डेन क्लीव्हर (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, कोल मॅककॉन्ची, रचिन रवींद्र, कायले जेमिसन आणि बेन लिस्टर.
