फिरकीपुढेही फूस अन् धड पेसही खेळता येईना! भारतीय फलंदाजांची अशी दैना होण्याची कारणं समजून घ्या

भारतीय फलंदाजांनी आपल्या भूमीतील खेळपट्ट्यांवर दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने ठेवलेल्या 489 धावांचा पाठलाग करताना 201 धावा करू शकले. ज्या खेळपट्टीवर दक्षिण अफ्रिकेने धावा केल्या. त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. कसं काय ते समजून घेऊयात

फिरकीपुढेही फूस अन् धड पेसही खेळता येईना! भारतीय फलंदाजांची अशी दैना होण्याची कारणं समजून घ्या
फिरकीपुढेही फूस अन् धड पेसही खेळता येईना! भारतीय फलंदाजांची अशी दैना होण्याची कारणं समजून घ्या
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 24, 2025 | 8:15 PM

कोलकाता कसोटी सामन्यानंतर गुवाहाटी कसोटी सामनाही भारतीय संघ गमवणार अशी स्थिती आहे. त्यामुळे भारतीय संघावर क्लिन स्विपचं सावट आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या आणि या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 201 धावाच करू शकला. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेकडे 288 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यात फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात त्यात धावांची भर घालत 314 धावांपर्यंत मजल मारली आहे. यात आणखी धावा जोडल्या जातील यात काही शंका नाही. पण प्रश्न असा आहे की ज्या खेळपट्टीवर दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज सहज फलंदाजी करतात तिथे भारतीय फलंदाजांना अपयश येण्याचं कारण काय? खरं तर गुवाहाटीची खेळपट्टी ही पाटा आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर धावा होणार हे सर्वांनाच माहिती होतं. तरीही भारतीय फलंदाज अपयशी ठरले. फिरकी नाही तर वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने भारतीय फलंदाजांना धोबीपछाड दिला. भारतीय फलंदाज धड फिरकी खेळत नाहीत, ना पेस खेळत? चला जाणून घेऊयात या मागचं गणित…

गौतम गंभीरची विचारशैली : टीम इंडियाच्या विचारामागे गौतम गंभीर आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने कसोटी संघात बॅटिंग किंवा बॉलिंग स्पेशालिस्ट ऐवजी अष्टपैलू खेळाडूंवर डाव लावत आहे. रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर यासारख्या खेळाडूंना संधी दिली गेली आहे. गुवाहाटीत नितीश कुमार रेड्डीचा गोलंदाजीत फार काही वापर केला गेला नाही. फलंदाजीतही फेल गेला. गौतम गंभीरच्या आधी टीम इंडिया स्पेशालिस्ट खेळाडूंवर विश्वास ठेवायची. पण आता त्याच्या अगदी उलट केलं जात आहे.

टॅलेंट आणि वयाचं गणित मांडून संघाचा समतोल बिघडला : प्रत्येक संघ सध्या टॅलेंटऐवजी वयाचं गणित पाहात यात काही शंका नाही. कारण भविष्याचा विचार करता तसा विचार करणं ठीक आहे. गुवाहाटी कसोटीत समालोचन करताना माजी क्रिकेटपटू अनिल कुंबलेने सांगितलं की, टीम इंडियाला विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना एकत्र पुढे नेण्यात अडचण येते. हे चारही 80पेक्षा जास्त कसोटी खेळले आहेत. स्पेशालिस्ट फलंदाज होते. पण आता युवा खेळाडूंवर भर दिला जात आहे. त्यामुळे क्वॉलिटी गोलंदाजांसमोर फलंदाज नांगी टाकत आहेत.

अति आक्रमकतेमुळे नुकसान : भारतीय संघ सध्या खूपच आक्रमक कोसटी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. इंग्लंडने केलेल्या चुकांमधून काहीच धडा घेतलेला दिसत नाही. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यासारखे खेळाडू आक्रमक फटके मारण्याच्या नादात बाद झाले. झटपट धावा करण्याच्या नादात विकेट देऊन बसले. खरं तर कसोटीत आक्रमक शॉट्सपेक्षा डिफेंस महत्त्वाचा आहे. भारतीय युवा फलंदाजांमध्ये याची उणीव दिसत आहे.

कसोटी स्पेशालिस्ट फलंदाजांची उणीव : सध्या टीम इंडियात कोणीही टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज नाही. साई सुदर्शनवर डाव लावून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये धावा केल्यात. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनुभवाची उणीव आहे. ध्रुव जुरेललाही फर्स्ट क्लास क्रिकेट फार अनुभव नाही. वॉशिंग्टन सुंदरची कहाणी काही वेगळी नाही. करूण नायर, अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खानसारख्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त धावा करूनही डावललं जात आहे.