IND vs SA : ऋषभ पंतने दोन दिवस खेळाडूंना झापलं, पण स्वत: ती चूक करून फसला
गुवाहाटी कसोटी हातून जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेला 288 धावांची आघाडी मिळाली. त्यात फॉलोऑन न देता खेळत आहेत. त्यामुळे भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. असं असताना कर्णधार ऋषभ पंतवर बोट दाखवलं गेलं आहे.

IND vs SA : गुवाहाटी कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपद आलं. त्यामुळे त्याच्याकडून दुसऱ्या कसोटीत फार अपेक्षा होत्या. मात्र या सामन्यात ऋषभ पंतचं विचित्र रूप क्रीडाप्रेमींना पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर ऋषभ पंत खेळाडू म्हणून मैदानात वावरताना मस्करीच्या मूडमध्ये असतो. पण यावेळी त्याचा आक्रमक तोरा पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर यासारख्या खेळाडूंवर डाफरला. इतकंच काय तर कसोटी क्रिकेटची थट्टा मांडली आहे हे देखील बोलून गेला. पण तिसऱ्या दिवशी पंतने असं काही केलं की, त्याचा खेळ पाहून त्यानेच कसोटी क्रिकेटची थट्टा मांडली आहे असं म्हणायची वेळ आली आहे. ऋषभ पंतने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात असं काही केलं की ते पाहून माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि डेल स्टेनही निराश झाले.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावांची खेळी केली. त्यामुळे ऋषभ पंत गोलंदाजांवर संतापलेला दिसला. इतकी मोठी धावसंख्या असताना ऋषभ पंतकडून मधल्या फळीत सावध खेळीची अपेक्षा होती. पण एक षटकार मारला आणि एक धाव घेत तंबूचा रस्ता पकडला. त्याची विकेट पाहून क्रीडाप्रेमी नाराज झाले. ऋषभ पंतने मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर काहीही विचार न करता शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला. त्याचा हा विचित्र शॉट पाहून अनिल कुंबळेला राग अनावर झाला आणि त्याने समालोचन करताना खडे बोल सुनावले.
अनिल कुंबळेने सांगितलं की, ‘भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते निराशाजनक आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली हे.’ डेल स्टेनच्या मते ऋषभ पंतचं हा चेंडू खेळताना डोकं ठिकाणावर नव्हतं. ऋषभ पंत बाद झाला आणि रिव्ह्यूही गमावला. पंतने शॉट खेळताना चेंडू वेगाने निघून गेला होता. त्यामुळे पंतने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. पण तिसऱ्या पंचांनी व्यवस्थित तपासलं आणि बाद दिलं. निष्काळजीपणाने खेळण्याचा फटका टीम इंडियाला बसला. कारण भारतीय संघ फक्त 201 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे दुसरा कसोटी सामना गमवण्याची वेळ आली आहे.
