
Vaibhav Suryavanshi IPL Run Records: आयपीएल 2026 लवकरच सुरू होणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी मोठी कमाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 175 धावांचा डोंगर उभारला आहे. त्याचा हा रेकॉर्ड तोडण्याची संधी कमी वयात वैभव सूर्यवंशी याला आहे. त्यालाही हा आकडा ओलांडून धावांचा महाडोंगर उभा करायचा आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी याचे कान टोचले आहेत. वैभव सूर्यवंशीला त्याने मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच संपूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रीत करण्यास सांगितले आहे.
रियान पराग याचा मोलाचा सल्ला
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने वैभवला आयपीएलमध्ये अनेक विक्रम करण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. कमी वयात गरजेपेक्षा त्याच्यावर अधिक दबाव असेल. त्यामुळे संघाने त्याला अधिकृत मीडिया इव्हेंट आणि इतर कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच वैभवला सोशल मीडियापासूनही दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे मन विचलीत होणार नाही. त्याच्यावर अतिरिक्त इतर दबाव येणार नाही. त्याच्यावर टीकेचा भडिमार अथवा स्तुतीने त्याची कामगिरी खराब होणार नाही, याची दक्षता संघ व्यवस्थापन घेत आहे.
पदार्पणातच दणकेबाज कामगिरी
वैभव सूर्यवंशीने गेल्या आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने दमदार कामगिरी केली. 19 एप्रिल 2025 रोजी लखनऊ सुपर जायटंसविरोधात खेळताना जयपूर येथे त्याने पहिला सामना खेळला. त्यावेळी त्याचे वय केवळ 14 वर्ष आणि 23 दिवस इतके होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने आयपीएल करिअरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. त्याचे नाव त्या निवडक खेळाडूंमध्ये सामील झाले, ज्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
अंडर-19 वर्ल्ड कपनंतर वाढल्या अपेक्षा
वैभव सूर्यवंशीने आयपीएलच नाही तर 19 वर्षांखालील विश्वचषकातही चांगली कामगिरी केली. त्याने इंग्लंडविरोधात अंतिम सामन्यात 80 चेंडूत 175 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. अनेकांनी त्याच्या फलंदाजीची दखल घेतली. त्याच्या शैलीची चर्चा झाली. आता आयपीएलमध्ये तो कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी संघ व्यवस्थापन त्याची काळजी घेताना दिसत आहे.