VHT : क्वार्टर फायनलमध्ये मुंबई विरुद्ध कर्नाटक आमनेसामने, कोण जिंकणार?
Karnataka vs Mumbai VHT : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 12 जानेवारीपासून उपांत्य फेरीतील 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईसमोर या सामन्यात कर्नाटकाचं आव्हान असणार आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या हंगामातील साखळी फेरीची सांगता झाली. त्यानंतर आता उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. उपांत्य पूर्व फेरीला 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. उपांत्य पूर्व फेरीतील पहिले 2 सामने हे सोमवारी 12 जानेवारीला होणार आहेत. तर उर्वरित 2 सामन्यांच्या थरार हा मंगळवारी 13 जानेवारीला रंगणार आहे. उपांत्य पूर्व फेरीत मुंबई, कर्नाटक, उत्तर प्रदेश, सौराष्ट्र, दिल्ली, विदर्भ, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी धडक दिली आहे. पहिल्या दिवशी 12 तारखेला उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र आणि मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यात उपांत्य पूर्व फेरीसाठी सामना होणार आहे. मात्र चाहत्यांचं अधिक लक्ष हे मुंबई विरुद्ध कर्नाटक सामन्याकडे असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तसेच दोन्ही संघाच्या साखळी फेरीतील कामगिरीचा आढवा घेऊयात.
मुंबई-कर्नाटक सामना
मुंबईने सी तर कर्नाटक टीमने ए ग्रुपमधून क्वार्टर फायनचं तिकीट मिळवलंय. उभयसंघातील सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. सामना टीव्ही आणि मोबाईलवर दाखवण्यात येणार की नाही? याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मयंक अग्रवाल कर्नाटकाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबई बाद फेरीत दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बाद फेरीतील सामन्यासाठी मुंबई संघाची 11 जानेवारीला घोषणा करण्यात आली.त्यानुसार सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळतोय. तर शार्दूल ठाकुर याला दुखापत झालीय. त्यामुळे सिद्धेश लाड याच्यासमोर आता मुंबईला सेमी फायनलमध्ये पोहचवण्याचं आव्हान आहे.
मुंबई बाद फेरीतील सामन्यांत प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहे.निवड समितीने बाद फेरीतून शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांना मुक्त केलं. तर दुसऱ्या बाजूला मयंक अग्रवाल कर्नाटक संघाचं नेतृत्व करणार आहे. कर्नाटक संघात मयंक व्यतिरिक्त देवदत्त पडीक्कल आणि करुण नायर हे 2 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर या दोघांना झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे.
मुंबई-कर्नाटकची कामगिरी
मुंबईने साखळी फेरीत 7 सामने खेळले. त्यापैकी 5 सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर कर्नाटक टीमने 7 पैकी 6 सामने जिंकले. त्यामुळे सामना हा आकड्यांवरुन रंगतदार होणार असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे. हा सामना कोण जिंकणार आणि कुणाचं आव्हान संपुष्टात येणार? हे काही तासांतच स्पष्ट होईल.
