विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी

| Updated on: Nov 13, 2021 | 3:54 PM

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद मिळवून दिलेले नाही.

विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी
Virat Kohli
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद मिळवून दिलेले नाही. यावेळी टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा त्याचा प्रयत्न होता पण तसे झाले नाही. या संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. या स्पर्धेत संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहलीची बॅटही फारशी चालली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. आफ्रिदीला वाटते की भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधाराची भूमिका सोडली पाहिजे. (Virat Kohli should be relieved from ODI and Test captaincy responsibilities : Shahid Afridi)

‘समा टीव्ही’ वाहिनीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, रोहित शर्माला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चांगला आहे. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेच्या शेवटी कोहलीने T20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. “मला वाटते की विराट भारतीय क्रिकेटसाठी एक अद्भुत शक्ती आहे, परंतु मला असेही वाटते की त्याने आता सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर ते चांगले होईल.

रोहितची मानसिकता मजबूत

आफ्रिदी आयपीएल-2008 मध्ये डेक्कन चार्जेसमध्ये रोहित शर्मासोबत खेळला आहे. एका चांगल्या कर्णधाराकडे जे गुण हवेत ते रोहितकडे आहेत, रोहितकडे मानसिक ताकद आहे आणि त्याने ती त्याच्या आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दाखवून दिली आहे. तो म्हणाला, “मी रोहितसोबत एक वर्ष खेळलोय आणि तो एक मजबूत मानसिकता असलेला अद्भुत खेळाडू आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला हवं तेव्हा तो रिलॅक्स राहतो. तसेच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो आक्रमकता देखील दाखवू शकतो. तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, त्याचं शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. खेळाडूंसाठी एक चांगला लीडर बनण्याची त्याची मानसिकता आहे.

कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या

कोहलीच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर आफ्रिदी म्हणाला की, मला त्याची अपेक्षा होती. आफ्रिदीला वाटते की कोहलीने कर्णधारपद सोडून तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचा आनंद घ्यावा. आफ्रिदी म्हणाला, “मला वाटते की विराटने कर्णधारपद सोडले पाहिजे आणि त्याच्या उर्वरित क्रिकेटचा आनंद घ्यावा. मला वाटते की त्याच्याकडे अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. तो एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे आणि मनावर कोणतेही दडपण न घेता तो मुक्तपणे खेळू शकतो. तो त्याच्या क्रिकेटचा आनंद घेईल.

33 वर्षीय विराटने अलीकडेच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेल्या रवी शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोहली एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडू शकतो आणि केवळ कसोटी संघाचे नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो जो त्याचा आवडता फॉर्मेट आहे असे संकेत दिले होते. 2019 पासून कोहलीने एकही कसोटी शतक झळकावलेले नाही.

इतर बातम्या

T20 World Cup Final live streaming: टी20 विश्वचषकाचा महामुकाबला, ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचा संघ, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

‘पाकिस्तानचा पराभव माझ्या जावयामुळे,’ शाहीद आफ्रिदीने शाहीनला ठरवलं जबाबदार, म्हणतो यॉर्कर टाकायची अक्कल नाही!

उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा

(Virat Kohli should be relieved from ODI and Test captaincy responsibilities : Shahid Afridi)