Injury : भारताच्या 4 खेळाडूंना दुखापत, चौघेही संघातून बाहेर, टीम अडचणीत
Indian Cricket Team : टीम इंडियातील 4 खेळाडूंचा दुखापतीने गेम केला आहे. गेल्या 24 तासांत या 4 पैकी 3 खेळाडूंना दुखापतीमुळे टीममधून बाहेर व्हावं लागलंय. या दुखापतीमुळे आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 11 जानेवारीला न्यूझीलंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने मात केली. भारताने 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताला विजयी करण्यात विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांनी प्रमुख योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी केएल राहुल आणि हर्षित राणा या जोडीने निर्णायक खेळी करुन भारताला विजयापर्यंत पोहचवलं. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. भारताच्या 4 खेळाडूंना दुखापत झालीय. चिंताजनक बाब अशी की या चौघांपैकी 3 खेळाडूंची न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर एक खेळाडू विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. हे चौघे दुखापतीचे शिकार झाले आहेत. हे 4 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
ऑलराउंडर सुंदर
टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. सुंदरला साईड स्ट्रेनचा त्रास झाल्याने उर्वरित एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्याच्या जागी आयुष बडोनी याचा भारतीय संघात पहिल्यांदा समावेश करण्यात आला. सुंदर या मालिकेतून बाहेर पडणारा एकूण दुसरा खेळाडू ठरला.
ऋषभ पंत
भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या संपूर्ण एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलंय. बीसीसीआयने 11 जानेवारी रोजी पहिल्या सामन्याला काही तास बाकी असताना पंतने या मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतल्याचं सांगितलं होतं. पंतला 10 जानेवारीला सरावादरम्यान दुखापत झाली होती. पंतला कंबरेच्या वरच्या भागात बॉल लागला होता. पंतला या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला.
तिलक वर्माला दुखापत
भारताचा टी 20i संघातील प्रमुख फलंदाज असलेल्या तिलक वर्मा याला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान त्रास जाणवला. त्यामुळे तिलकवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिलकला त्यामुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांना मुकावं लागलंय. तसेच तिलक शेवटच्या 2 टी 20i सामन्यांसाठी उपलब्ध असणार की नाही? हे त्याच्या तब्येतीवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं होतं.
सर्फराज खानचं बोट तुटलं
मुंबईचा फलंदाज सर्फराज खान याच्या बोटाला दुखापत झालीय. सर्फराजचं बोट तुटलं आहे. त्यामुळे सर्फराजला बंगळुरुतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये पाठवण्यात आलंय. सर्फराजला या दुखापतीमुळे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कर्नाटक विरूद्धच्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्याला मुकावं लागलं आहे.
