
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने अपेक्षेप्रमाणे धडक मारली आहे. सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट राखून धुव्वा उडवला. या विजयात मोलाचा हातभार लागला तो संजू सॅमसनचा. कारण 196 धावांचा पाठलाग करताना त्याने केलेल्या नाबाद 97 धावा महत्त्वाच्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजयाची चव चाखता आली. संजू सॅमसनची सध्याची खेळी पाहता त्याला सुरूवातीच्या सामन्यात बेंचवर बसवणं कितपत योग्य होतं? सुरूवातीच्या सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी ओपनिंग केली. अभिषेक शर्मा वारंवार अपयशी ठरल्यानंतरही संजू सॅमसनला काही संधी दिली गेली नाही. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेला सामोरं गेला.
संजू सॅमसनला इतके दिवस प्लेइंग इलेव्हनमधून का वगळण्यात आले? असा प्रश्न पत्रकारांना गौतम गंभीरला विचारला. तेव्हा गौतम गंभीरने सांगितलं की, ‘संजू सॅमसनने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके ठोकली आहेत. आम्हाला त्याच्या प्रतिभेवर कधीच शंका नव्हती. न्यूझीलंडविरुद्धची मालिका त्याच्यासाठी कठीण होती आणि प्रशिक्षक म्हणून मला वाटले की त्याला विश्रांती देणे आवश्यक आहे. जेणेकरून तो ताजातवाना होऊन परतू शकेल. पण आम्ही यावर स्पष्ट होतो. जेव्हा जेव्हा टीम इंडियाला विश्वचषकाच्या मोठ्या सामन्यात त्याची गरज पडली तेव्हा संजू सॅमसन मैदानात उतरेल आणि सामना जिंकून देईल.’
‘संजू सॅमसन हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने त्याची योग्यता सिद्ध केली आणि जबाबदारी घेतली.’ , असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांना सुरुवातीला संघाचे संयोजन आणि फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. सॅमसन नेटमध्ये चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळे, फलंदाजी क्रमवारीत बदल करण्यात आला आणि त्याला सलामीवीर म्हणून आणण्यात आले, असं गौतम गंभीर पुढे म्हणाला.
टीम इंडियाने संजू सॅमसनला सलामीला आणण्यासाठी फलंदाजी क्रमवारीत दोन बदल केले आहेत. सलामीवीर असलेल्या इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले. संघ व्यवस्थापनाने रिंकू सिंगला वगळून तिलक वर्मा यांना मधल्या फळीत खेळवले. आता उपांत्य फेरीतही असं कॉम्बिनेशन असेल यात काही शंका नाही.