मोहम्मद सिराज आशिया कप स्पर्धेतून बाहेर? गौतम गंभीरचा निर्णय पाहता तसंच होण्याची शक्यता
भारताने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली. पाचव्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे सामना जिंकला आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. पण आता आशिया कप स्पर्धेत मोहम्मद सिराज खेळणार की नाही याबाबत अजूनही काही स्पष्ट नाही.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली. ही मालिका भारताने 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेत मोहम्मद सिराजने सर्वाधिक 23 विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीचा सामना करणं काही इंग्लंडच्या फलंदाजांना जमलं नाही. त्याने इंग्लंडला वारंवार अडचणीत आणलं. शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. आता भारतीय संघ ब्रेकनंतर सप्टेंबर 2025 मध्ये पुन्हा मैदानात उतरणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. हा टी20 फॉर्मेट असल्याने सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे. त्यामुळे या संघात मोहम्मद सिराज असेल की नाही याबाबत साशंकता आहे.
मोहम्मद सिराजने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 44 वनडे आणि कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणलं आहे. पण टी20 फॉर्मेटमध्ये त्याला तशी काही संधी मिळाली नाही. भारतासाठी त्याने शेवटची टी20 मालिका जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली होती. पण बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याला डावलण्यात आलं होते. मोहम्मद सिराज टीम इंडियासाठी फक्त 16 टी20 सामने खेळला आहे. या काळात त्याने 7.79 च्या इकॉनॉमीने धावा देताना 14 विकेट्स घेतल्या आहेत.
गौतम गंभीर जुलै 2024 मध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्यानंतर फक्त एक टी20 मालिका खेळला आहे. गंभीरचं सर्व लक्ष युवा खेळाडूंकडे आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजला टी20 फॉर्मेट हवी तशी संधी मिळाली नाही. गौतम गंभीरच्या रणनिती पाहता वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगवेगळी टीम करण्यावर त्याचा भर आहे. सिराजची जागा वनडे आणि कसोटी संघात पक्की आहे. पण टी20 फॉर्मेटमध्ये सिराजला संधी द्यावी या भूमिकेत गौतम गंभीर सध्या तरी दिसत नाही? त्यात अर्शदीप सिंगला टी20 फॉर्मेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या जोडीला संधी दिली जाते. अशा स्थितीत मोहम्मद सिराजला संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात सिराज होता. सुरुवातीच्या सामन्यात त्याला संघाच्या प्लेइंग 11 मध्येही निवडण्यात आले होते.
