रोहित शर्मा पुन्हा एकदा होणार कर्णधार? आयपीएल 2025 पूर्वी हिटमॅनने सांगितली मनातली गोष्ट
टीम इंडिया सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. त्यामुळे या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल 2025 स्पर्धेच्या चर्चा रंगल्या आहेत. कशी रणनिती असेल इथपासून काय करता येईल इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. असं असताना रोहित शर्माने आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मनातली गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे क्रीडारसिक रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधार होईल, असा अंदाज बांधत आहेत.

आयपीएल इतिहासात सर्वोत्तम कर्णधार म्हणून रोहित शर्माची गणना होते. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच जेतेपदं जिंकली आहेत. पण मागच्या पर्वात रोहितचं कर्णधारपद गेलं आणि ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. आता 2025 आयपीएल स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने पुन्हा एकदा कर्णधारपदाचे संकेत दिले आहेत. मुंबईत आयोजित CEAT अवॉर्ड्स कार्यक्रमात रोहित शर्माने हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. आयपीएलमध्ये यशस्वी कर्णधार होण्याची कारणं सांगितली. तसेच पुढच्या पर्वात पुन्हा एकदा कर्णधार म्हणून दिसू शकतो असे संकेतही दिले. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये कर्णधारपदाच्या चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पाच चषकांवर नाव कोरलं आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या विधानाचा चाहते तसा अर्थ लावणार यात शंका नाही.
‘आयपीएलमध्ये पाच जेतेपदं जिंकण्यामागे एक कारण आहे. मी थांबणार नाही. कारण जेव्हा तुम्हाला सामने जिंकण्याची चव चाखायला मिळते तेव्हा तुम्हाला थांबायचे नसते, तुम्ही एक संघ म्हणून पुढे जात राहता. भविष्यातही आम्ही असेच प्रयत्न करत राहू.’, असं रोहित शर्मा म्हणाला. त्याच्या या विधानाचा अर्थ कर्णधारपदासोबत जोडला जात आहे. सध्या रोहित शर्मा कोणत्याही संघाचा कर्णधार नाही. मुंबई इंडियन्सकडून एक खेळाडू म्हणून खेळत आहे. तसेच आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे भविष्यात दुसऱ्या संघात सहभागी होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर संघात गेल्यास कर्णधारपद मिळू शकते, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे.
रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनने 2013, 2015, 2017, 2019, 2020 मध्ये जेतेपदाला गवसणी घातली होती. पण 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात सर्व उलथापालथ झाली. मुंबईकडून गुजरात टायटन्समध्ये गेलेल्या हार्दिक पांड्याचं कमबॅक झालं. मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोतून हार्दिक पांड्याला घेतलं आणि कर्णधारपद सोपवलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. इतकंच काय मुंबई इंडियन्सचं आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं.
