रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळणार की नाही? ब्रोंको टेस्ट झाली नाही कारण…
भारताचा वनडे संघाचा कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मागच्या आठवड्यात यो-यो टेस्ट झाली आणि त्यात पासही झाला. पण त्याची ब्रोंको टेस्ट काही झाली नाही. त्याचं कारण आता समोर आलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर भारताची एकही वनडे मालिका झालेली नाही. त्यामुळे रोहित शर्माची टीम इंडियात पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून मैदानात पुनरागमनासाठी रोहित शर्मा धडपड करत आहे. कारण आता फिट अँड फाईन असेल तरच त्याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळेल. मागच्या आठवड्यात बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये यो-यो टेस्ट पास केली. या दरम्यान त्याच्यासह शुबमन गिल आणि इतर खेळाडूंनही ही टेस्ट दिली होती. त्यानंतर रोहित शर्माची ब्रोंको टेस्ट होणार होती. मात्र ही टेस्ट काही झाली नाही. त्याचं मोठं कारण समोर आलं आहे. टीम इंडियाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ली रॉक्स यांनी ही टेस्ट आणली आहे. पण टेस्टची अजूनही सुरुवात झालेली नाही. रिपोर्टनुसार, रोहित शर्माची फिटनेससाठी ब्रोंको टेस्ट होणार होती. पण ही टेस्ट अजूनही बीसीसीआयने लागू केली नाही. त्यामुळे रोहित शर्माने ही टेस्ट दिली नाही.
ब्रोंको टेस्ट ही रग्बी स्पर्धेपूर्वी घेतली जाते. यात खेळाडू स्पर्धेसाठी फीट आहे की नाही याची चाचपणी केली जाते. आता ही टेस्ट भारतीय क्रिकेटपटूंसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 20, 40, 60 मीटर शटल रनिंग केली जाते. यात तीन शर्यतींचा समावेश आहे. यात खेळाडूंना सहा मिनिटात सलग पाच सेट करावे लागतात. म्हणजेच खेळाडूला कोणत्याही ब्रेकशिवाय 1200 मीटर धावावं लागतं. यातून स्टॅमिना, वेग आणि कंडिशनची मूल्यांकन केलं जातं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही टेस्ट आशिया कप स्पर्धेपूर्वी दुबईत होऊ शकते. टीम इंडिया 4 सप्टेंबरला युएईला रवाना होणार आहे. 5 सप्टेंबरला आयसीसी अकादमीत पहिलं सराव शिबीर आहे. यावेळी ब्रोंको टेस्ट होऊ शकते. पण हे देखील निश्चित नाही.
रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा अजूनही वनडे संघाचा कर्णधार असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मेहनत घेत आहे. रोहित शर्माने शेवटचा वनडे सामना 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता पुढच्या महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
