IPL 2026 : संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? सीईओ कासी विश्वनाथन यांनी चित्र केलं स्पष्ट
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण राजस्थान रॉयल्सऐवजी त्याने दुसऱ्या फ्रेंचायझी भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर संजू सॅमसनचं नाव वेगवेगळ्या फ्रेंचायझींसोबत जोडलं जात आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मोठी उलथापालथ होणार यात काही शंका नाही. संजू सॅमसनबाबत तर रोज कोणता ना कोणता संघ जोडला जात आहे. कधी दिल्ली कॅपिटल्स, तर कधी कोलकाता नाईट रायडर्स, तर कधी चेन्नई सुपर किंग्स.. पण संजू सॅमनस कोणत्या फ्रेंचायझीकडून खेळणार हे मात्र स्पष्ट नाही. त्यामुळे रोज येणाऱ्या बातम्यांपैकी कोणत्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. नुकताच एका रिपोर्टमध्ये संजू सॅमसनसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं गेलं. पण आता संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्सनेही फिल्डिंग लावल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी काय होतं? याकडे लक्ष लागून आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, संजू सॅमसनबाबत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी दोन्ही फ्रेंचायझींमध्ये ट्रेडबाबत चर्चा सुरू होती. मात्र राजस्थान रॉयल्सने त्या बदल्यात सीएसकेच्या स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही ट्रेड फिस्कटली होती. त्यानंतर दोन्ही फ्रेंचायझीमध्ये चर्चा बंद झाली होती. पण आता पुन्हा एकदा दोन्ही फ्रेंचायझी संजू सॅमसनबाबत चर्चा करत आहेत. रॉयल्सचे मालक मनोज बडाले नुकतेच युकेहून भारतात परतले असून विविध फ्रँचायझींसोबत चर्चा सुरू केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी संजू सॅमसनबाबत चर्चा सुरु आहे. दुसरीकडे, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी संजू सॅमसनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. संजू सॅमसनच्या बदल्यात त्याची देवाणघेवाण करण्याची योजना आखली आहे. या प्रकरणावर येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल. 11 नोव्हेंबरपर्यंत संजू सॅमसनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनच्या बदल्यात एका अव्वल खेळाडूशी पाठवण्याच्या तयारीत आहे. फ्रँचायझीने स्टार खेळाडूशी संपर्क साधला असून राजस्थानमधून खेळण्यास तयार आहे ?का असे विचारले आहे. आयपीएल ट्रेड नियमांनुसार, जर खेळाडू कराराला सहमत असेल तरच त्याची देवाणघेवाण करता येते. पण चेन्नई सुपर किंग्स कोणत्या दिग्गज खेळाडूला रिलीज करेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
