WPL 2026 Schedule: वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर, स्पर्धेसाठी उरले फक्त 40 दिवस
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. खेळाडूंवर बोली लागत असताना बीसीसीआयने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 9 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा संपूर्ण जगात बोलबाला आहे. महिलांची सर्वात महागडी लीग म्हणून या स्पर्धेकडे पाहीलं जाते. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर या स्पर्धेचं महत्त्व आणखी वाढलं आहे. मागच्या तीन पर्वात या स्पर्धेने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. या स्पर्धेच्या चौथ्या पर्वासाठी खेळाडूंवर बोली लावली जात आहे. दुसरीकडे, या लिलावादरम्यान बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत घोषणा केली आहे. ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरामध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात 9 जानेवारीपासून होणार आहे. तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत ही स्पर्धा संपणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना वडोदरामध्ये होणार आहे. चौथ्या पर्वात विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पर्धा कधी सुरु होणार आणि कधी संपणार हे स्पष्ट झालं आहे. पण सामने कसे होणार हे मात्र अस्पष्ट आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत मागच्या पर्वाप्रमाणे 22 सामने होतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ 8 सामने खेळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ एकमेकांसमोर दोन उभा ठाकणार आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंतिम फेरीचं थेट तिकीट मिळणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी लढावं लागणार आहे.
🚨 NEWS 🚨
The #TATAWPL 2026 will be held from 9th January to 5th February in Navi Mumbai and Vadodara 🙌
The DY Patil Stadium in Navi Mumbai will host the opener. The BCA Stadium in Vadodara will host the final. 🏟️#TATAWPLAuction pic.twitter.com/11L5ioLQxN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत प्लेऑफचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला होता. हा सामना मुंबईने जिंकला अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला 8 धावांनी पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दोनदा जेतेपद मिळवलं आहे. 2023 आणि 2025 साली जेतेपदाचे मानकरी ठरले. तर 2024 साली स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद मिळवलं होतं.
