
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे बाद फेरीसाठी चुरस वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वगळता इतर चार संघात ही चुरस आहे. पण आरसीबीचं थेट अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्नही लांबलं आहे. या स्पर्धेच्या 15व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमवून 109 धावा केल्या. तसेच विजयासाोठी 110 धावांचं आव्हान दिलं. खरं तर दिल्ली कॅपिटल्ससाठी हे सोपं आव्हान होतं. दिल्ली कॅपिटल्सने 15.4 षटकात 3 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने एलिमिनेटर फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
आरसीबीला पराभूत केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली की, ‘शंभर टक्के आणि श्रेय संघाला जाते. मला वाटते की संघाने आम्ही जे नियोजन केले ते अंमलात आणnx. म्हणून मला वाटते की कर्णधार म्हणून माझे काम सोपे होते. मला वाटते की स्मृती फलंदाजी करत असताना आमच्यावर थोडे दबाव होता. पण मला वाटते की एक शानदार झेल घेतला आणि सामन्यात आलो. आम्ही हे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम देखील केले. म्हणून मी मुलींना खूप श्रेय देईन.’
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या स्पर्धेतील पहिला पराभव पाहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. पण थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने या सहा पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.169 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सने सहा पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. 6 गुण आणि -0.341 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स 6 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि +0.046 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी, यूपी वॉरियर्स 6 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि -0.769 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.