Nadine de Klerk ने मॅच फिरवली, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर मात

WPL 2026 MI vs RCB 1st Match Result : स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमात सनसनाटी अशी सुरुवात केली आहे. आरसीबीने मुंबईवर मात करत या हंगामात विजयी सलामी दिली आहे.

Nadine de Klerk ने मॅच फिरवली, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर मात
Nadine de Klerk MI vs RCB WPL 2026
Image Credit source: WPL X Account
| Updated on: Jan 10, 2026 | 12:40 AM

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील (WPL 2026) पहिलाच सामना सनसनाटी आणि चित्तथरारक असा झाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात आरसीबीने शेवटच्या चेंडूवर सनसनाटी असा विजय मिळवला. मुंबईने आरसीबीसमोर 155 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने या धावांचा शानदार पाठलाग केला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. तेव्हा नॅडिन डी क्लार्क हीने चौकार लगावला आणि आरसीबीला जिंकवलं. आरसीबीने यासह गतविजेत्या मुंबईला 3 विकेट्सने पराभूत केलं. आरसीबीने 7 विकेट्स गमावून 157 धावा केल्या.

सामन्यात काय झालं?

आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईसाठी ओपनर जी कामालिनी हीने 32 धावा केल्या. तर सजीवन सजना आणि निकोला केरी या जोडीने अखेरच्या टप्प्यात निर्णायक खेळी साकारली. सजीवन सजनाने 45 तर केरीने 40 धावा जोडल्या. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आरसीबीसमोर 155 धावांचं आव्हान ठेवता आलं.

आरसीबीची कडक सुरुवात आणि घसरगुंडी

आरसीबीने झंझावाती सुरुवात केली. कर्णधार स्मृती मंधाना आणि ग्रेस हॅरीस या आरसीबीच्या सलामी जोडीने 40 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं. मुंबईने आरसीबीला झटपट 5 झटके दिले. स्मृती 18, ग्रेस 25, दयालन हेमलथा 7, ऋचा घोष 6 आणि राधा यादव 1 धाव करुन आऊट झाली. त्यामुळे आरसीबीची स्थिती 40 आऊट 0 वरुन 5 आऊट 65 अशी झाली.

नॅडिन डी क्लार्कने गेम फिरवला

त्यानंतर नॅडीन डी क्लार्क हीने शेपटीच्या फलंदाजांना सोबत घेत किल्ला लढवला. अरुंधती रेड्डी हीने नॅडीन डी क्लार्कला कडक साथ दिली. या दोघींनी सहाव्या विकेटसाठी 51 बॉलमध्ये 52 रन्सची निर्णायक पार्टनरशीप केली. अरुंधतीने 20 धावा केल्या. त्यानंतर श्रेयांका पाटील 1 धाव करुन बाद झाली. त्यानंतर आलेल्या प्रेमा रावत हीने नॅडीनला अपेक्षित साथ दिली. नॅडीनने प्रेमाच्या सोबतीने फटकेबाजी सुरु ठेवत आरसीबीला सामन्यात कायम ठेवलं. नॅडीनने फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकात पोहचवला.

आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

शेवटच्या ओव्हरचा थरार

आता आरसीबीला शेवटच्या 6 चेंडूत 18 धावांची गरज होती. मुंबईकडून नॅट सायव्हर ब्रँट हीने पहिले 2 डॉट बॉल टाकले. त्यामुळे नॅडीनवर दबाव वाढला. मात्र नॅडीनने त्यानंतर धमाका केला. नॅडीनने शेवटच्या 3 चेंडूत 6,4 आणि 6 अशी फटकेबाजी केली. त्यामुळे आता शेवटच्या चेंडुवर 2 धावांची गरज होती. नॅडीनने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि आरसीबीला सनसनाटी विजय मिळवून दिला. नॅडीनने 44 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 63 रन्स केल्या. तर प्रेमाने 4 बॉलमध्ये 2 फोरसह नॉट आऊट 8 रन्स केल्या.