‘फिरोजशाह कोटला’चं अरुण जेटली स्टेडिअम नामकरण

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडिअमचे आज (12 सप्टेंबर) नामांतर करण्यात आलं आहे. या स्टेडिअमला आता भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली (Arun jaitaly) यांचे नाव देण्यात आलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:00 PM, 12 Sep 2019
'फिरोजशाह कोटला'चं अरुण जेटली स्टेडिअम नामकरण

दिल्ली : राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडिअमचे नामांतर करण्यात आलं आहे. या स्टेडिअमला आता भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली (Arun jaitaly) यांचे नाव देण्यात आलं आहे. त्यासोबतच स्टेडिअमच्या एका स्टँडला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही (Virat Kohli) नाव दिलं आहे. याचं उद्घाटन गुरुवारी सायंकाळी 6 वाजता विराट (Virat Kohli) कोहलीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर मंत्री उपस्थित होते.

अरुण जेटली (Arun Jaitaly) हे 1999 ते 2013 दरम्यान दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष होते. या काळात त्यांनी क्रिकेटला आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा पुरवल्या होत्या. त्यासोबतच दिल्लीतील क्रिकेटसाठी आणि स्टेडिअमच्या देखभालीसाठीही त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत.

“मी आयोजकांचे खूप आभार मानतो. अमित शाह, संपूर्ण क्रिकेट संघ, माजी क्रिकेटर, माझी पत्नी, माझा भाऊ, माझे प्रशिक्षक मी या सर्वांचे खूप आभार मानतो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही वेळ खूप अभिमानास्पद आहे”, असं विराट कोहली म्हणाला.

दरम्यान, भारतीय संघ 15 सप्टेंबरपर्यंत दिल्लीत राहणार असल्याचं बोललं जात आहे. भारतीय संघ 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिके विरुद्ध धर्मशाळा येथे, 18 सप्टेंबर मोहालीमध्ये आणि 22 सप्टेंबरला बंगळुरुमध्ये टी 20 सामना खेळणार आहे.