FIH Women’s Hockey WC: कॅप्टन सविता पुनियाची जबरदस्त कामगिरी, पेनल्टी शूटआऊट भारताचा कॅनडावर विजय
FIH Women's Hockey WC: भारतीय महिला संघाने हॉकी वर्ल्ड कप मधला पहिला सामना जिंकला आहे. कॅप्टन सविता पुनियाने शानदार गोलकीपिंग केली.

मुंबई: भारतीय महिला संघाने हॉकी वर्ल्ड कप (Womens Hockey World cup) मधला पहिला सामना जिंकला आहे. टीम इंडियाने मंगळवारी कॅप्टन सविता पुनियाच्या (Savita Punia) शानदार गोलकीपिंगच्या बळावर कॅनडाला पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) मध्ये 3-2 ने हरवलं. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. भारताची गोलकीपर आणि कॅप्टन सविता पुनियाने शूटआऊट मध्ये कॅनडाचे गोल रोखले. सामन्यादरम्यानही तिने कॅनडाच्या खेळाडूंना गोल करु दिले नाहीत.
भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर
भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. आता उर्वरित सामन्यांचा उपयोग राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी केला जाईल. भारताला स्पेन विरुद्ध क्रॉसओवर मॅच मध्ये 1-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत.
भारत पिछाडीवर होता
भारतीय संघ पहिल्या क्वार्टर मध्ये 1-0 ने मागे होती. कॅनडाच्या मॅडलिन सेकोने 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. दोन क्वार्टर म्हणजे हाफ टाइम पर्यंत कॅनडाच्या टीमकडे 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये म्हणजे चौथ्या हाफ मध्ये भारतीय संघाने काउंटर हल्ला वाढवला. याचा फायदा टीम इंडियाला मिळाला.
भारताकडून 58 व्या मिनिटाला गोल
58 व्या मिनिटाला सलीमा टेटेने रिबांउडवर गोल डागून 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरचा ड्रॅग फ्लिक रोवान हॅरिसने रोखला. त्यानंतर सलीमा टेटेने रिबांउडवर चेंडू गोलपोस्ट मध्ये पोहोचवला. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर पेनल्टी शूटआउटने सामन्याचा निकाल लागला.
