विराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला, तुम्ही थकत नाही का? पंतप्रधानांच्या प्रश्नावर विराट म्हणतो...

विराटसोबत चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे विराटला प्रश्न विचारला (Fit India Movement 2020).

विराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला, तुम्ही थकत नाही का? पंतप्रधानांच्या प्रश्नावर विराट म्हणतो...

नवी दिल्ली : ‘फिटनेस इंडिया’ अभियानाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने (Fit India Movement 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराटसह देशभरातील नागरिकांना फिटनेससाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक दिग्गजांसोबत चर्चा केली.

विराटसोबत चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे विराटला प्रश्न विचारला. “विराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला आहे. तुमच्या मैदानावर अनेक हालचाली आम्ही बघतो. तुम्ही प्रचंड चपळ आहात. तुम्ही एवढी धावपळ करतात. त्यामुळे तुम्ही कधी थकत नाहीत का?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विराट कोहलीला विचारला (Fit India Movement 2020) .

पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाला विराटने हसत उत्तर दिलं. “शारीरीक काम केलं तर प्रत्येकाला थकवा जाणवतो. पण तुम्ही फिटनेसची काळजी घेतली, चांगलं जेवण केलं, पुरेशी झोप घेतली तर तुम्हाला तितका फारसा थकवा जाणवणार नाही किंवा तुमचा रिकव्हरी रेट चांगला राहील. जर मी थकतो आणि एक मिनिटात पुन्हा उभा राहतो तर माझा तो प्लस पॉईंट आहे”, असं उत्तर विराटने दिलं.

हेही वाचा : तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विराटला योयो टेस्टबाबत प्रश्न विचारला. क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूंसाठी एक योयो टेस्ट होत आहे. ही टेस्ट नेमकी असते तरी काय? या टेस्टपासून कॅप्टनला सूट असते का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला.

कर्णधाराला योयो टेस्टपासून सूट मिळते का? हा प्रश्न ऐकून विराटला हसू आले. त्याने हसतहसत पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं.

“योयो टेस्ट ही प्रत्येक खेळाडूसाठी गरजेची आहे. जगातील इतर संघातील खेळाडूंची आपल्या संघाच्या खेळाडूंच्या फिटनेसशी तुलना केली तर आपल्या खेळाडूंची फिटनेस क्षमता अजूनही कमी आहे. खेळाडूंची ही क्षमता वाढावी, असा आमचा उद्देश आहे”, असं विराट कोहलीने सांगितलं.

“टी-20 किंवा एकदिवसीय सामने एका दिवसात संपतात. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये सलग पाच दिवस मैदानावर खेळावं लागतं. त्यामुळेच योयो फिटनेस टेस्ट जरुरीची आहे. या फिटनेस टेस्टसाठी सर्वात आधी मीच धावतो. या टेस्टमध्ये मीदेखील नापास झालो तर माझीही अंतिम सामान्यात कदाचित निवड होणार नाही”, असं विराट कोहली म्हणाला.

“फिटनेस टेस्टसारखी यंत्रणा अंमलात आणणं संघासाठी चांगलं आहे. कसोटी सामन्यांमध्ये दोन किंवा तीन दिवसांनंतर खेळाडूंना थकवा जाणवायला लागतो. आपल्या जलद गोलंदाजांचं जगभरात नाव आहे. त्यांना चांगल्या फिटनेसच्या जोरावर दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीदेखील चमकदार कामगिरी दाखवता येऊ शकते”, असं मत विराटने मांडलं.

“आपल्या खेळाडूंमध्ये पूर्वीपासून कौशल्य भरपूर आहे. पण काही वेळा शरीर थकायचं. त्यामुळे त्याचा परिणाम कामगिरीवर व्हायचा आणि समोरचा संघ विजयी व्हायचा. मात्र, आता खेळाडूंकडे नीट लक्ष दिलं जातं. त्यामुळे आता चांगली कामगिरी बघायला मिळत आहे”, असं विराट कोहली म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *