IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ट्राय-सिरीजमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला? ICC चा नवा प्लॅन समोर
India vs Pakistan Cricket : भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाही. मात्र आता आयसीसी यावर तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. या दोन्ही संघांचा सामना प्रामुख्याने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किंवा आशिया कपमध्येच पाहायला मिळतो. आता भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता असा पर्याय शोधत आहे, ज्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरिक्तही भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध खेळू शकतील.
ट्राय-सिरीज किंवा चार देशांची स्पर्धा?
आयसीसी द्विपक्षीय मालिकेला पर्याय म्हणून 3 देशांची ट्राय-सिरीज किंवा 4 देशांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. दुबईमध्ये 22 आणि 23 सप्टेंबर रोजी आयसीसीची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत 2027 ते 2031 या कालावधीत फ्यूचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत चर्चा होणार आहे.
पाकिस्तानसोबत स्वतंत्र मालिका नाही
भारत सरकार आणि बीसीसीआयच्या धोरणानुसार पाकिस्तानसोबत स्वतंत्र द्विपक्षीय मालिका खेळणे सध्या शक्य नाही. मात्र, 3 किंवा 4 देशांचा संघ सहभागी असलेल्या स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास तशी अडचण येणार नाही.
तिसऱ्या देशात होऊ शकतात सामने
भारत आणि पाकिस्तानमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे सामने एखाद्या तिसऱ्या देशात आयोजित केले जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, यासाठी यूएई, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश आघाडीवर आहेत. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. द्विपक्षीय मालिकेच्या तुलनेत तीन किंवा चार देशांच्या स्पर्धांमध्ये चाहत्यांची अधिक रुची निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाल्यास ब्रॉडकास्टर्स, स्पॉन्सर्स आणि आयोजकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका कधी झाली?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या संघाने भारताचा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किंवा आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले आहेत. मात्र, ट्राय-सिरीज किंवा चार देशांच्या स्पर्धेचा हा प्रस्ताव अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. दुबई येथे होणाऱ्या बैठकीत 12 कसोटी खेळणाऱ्या देशांच्या क्रिकेट बोर्डांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बीसीसीआयसह इतर बोर्डांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आगामी काळात क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात.
