IND vs PAK : लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी युद्धभूमीवर जाणार? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय

M S Dhoni Territorial Army : भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे भारतीय सैन्याच्या ताकदीत आणखी वाढ होणार आहे. टेरिटोरियल आर्मीला देशसेवेसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. यामुळे साऱ्यांचं लक्ष हे महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे.

IND vs PAK : लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी युद्धभूमीवर जाणार? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय
M S Dhoni Honorary Lieutenant Colonel in Territorial Army
Image Credit source: Waseem Andrabi/HT Via Getty Images
| Updated on: May 09, 2025 | 7:06 PM

भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर कारवाई केली. मात्र पाकिस्तानच्या यानंतरही कुरापत्या सुरुच आहेत. पाकिस्तानने 8 मेच्या रात्री भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने पु्न्हा प्रत्युत्तरात पाकिस्तानवर कारवाई केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

महेंद्रसिंह धोनी युद्धभूमीवर जाणार?

भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सैन्य दलाची ताकद आणखी वाढावी, यासाठी टेरिटोरियल आर्मीतील जवानांना बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीचा सदस्य आहे. धोनीला 2011 साली टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलं होतं. त्यामुळे आता धोनीही युद्धभूमीवर जाणार का? याकडे देशवासियांचं लक्ष लागून आहे.

टेरिटोरियल आर्मी निमलष्करी दल आहे. या टेरिटोरियल आर्मीकडून सैन्य दलाला मदत केली जाते. टेरिटोरियल आर्मीतील जवानांना पूर्णवेळ सेवा देण्याची सक्ती नसते. हे जवान नोकरी करु शकतात. तसेच गरजेच्या वेळेस त्यांना सैन्य दलाची मदत करावी लागते.

धोनीचं सैन्यासह प्रशिक्षण

महेंद्रसिंह धोनी याने 2015 साली सैन्यासह शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. उल्लेखनीय बाब म्हणजे धोनीने आग्रा येथे प्रशिक्षणादरम्यान भारतीय सैन्याच्या एअरक्राफ्टमधून 5 वेळा पॅराशूटद्वारे उडी मारली होती. धोनीने 2019 साली काश्मीरमध्ये 2 आठवडे प्रशिक्षण घेतलं. धोनीने यावेळेस निमलष्करी दलासह वेळ घालवला होता. धोनीने तेव्हा गस्त घालण्यासह अनेक लष्करी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. धोनीला देण्यात आलेलं ‘लेफ्टनंट कर्नल’ हे मानद पद आहे. यामागे सैन्य दलाची प्रतिमा उंचावणं हा उद्देश आहे. यामागे युद्धात सहभागी होणं हा उद्देश नाही.

धोनीकडे सीएसकेचं नेतृत्व

महेंद्रसिंह धोनी याने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनी तेव्हापासून आयपीएलमध्ये खेळतोय. धोनी चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करतो. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) चेन्नईचं नेतृत्व करत होता. मात्र धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची निराशाजनक कामगिरी राहिली. चेन्नईला या मोसमातील 12 पैकी फक्त 3 सामन्यांतच विजयी होता आलं.

आयपीएल 2025 स्थगित

दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने स्थगित करण्यात आले आहेत. या उर्वरित सामन्यांचं आयोजन लवकरच परिस्थिती पाहून केलं जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.