India Women Asia Cup 2026 Memes : मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार, भारत जिंकताच मिम्सचा पाऊस
भारताने महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत आठव्यांदा ट्रॉफी जिंकली. भारताचा विजय स्पष्ट होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी मीम्सचा पाऊस पाडला.

महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत 8 व्यांदा चषकावर आपले नाव कोरले. भारताच्या या ऐतिहासिक आणि एकतर्फी विजयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी जल्लोष साजरा केलाच, पण त्याचसोबत मीम्सचा मोठा पाऊस पडला. भारताचा विजय अगदी स्पष्ट दिसू लागताच क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर करायला सुरुवात केली. यामध्ये आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष ‘मोहसिन’ नक्वीचा मीम सर्वाधिक व्हायरल झाला. “मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला… हा तर ट्रॉफी घेऊन पळायलाच तयार!, अशा मजेशीर कॅप्शनसह नेटकऱ्यांनी विविध मीम्स शेअर करत धुमाकूळ घातला.
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘लेडी सेहवाग’ शेफाली वर्मा (68) आणि स्मृती मानधना (59) यांच्या तुफानी अर्धशतकांमुळे भारताने 20 षटकांत 183 धावांचा डोंगर उभारला होता. शेफालीने अवघ्या 24 चेंडूंत आशिया चषकातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही केला.
184 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी पुरती ढेपाळली. एन. श्री चरणी (4 बळी) आणि दीप्ती शर्मा (3 बळी) यांच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पूर्ण संघ 111 धावांत ऑलआऊट झाला. भारताने 2024 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत श्रीलंकेला धुळ चारली, आणि इकडे सोशल मीडियावर चाहत्यांनी मीम्सच्या माध्यमातून विजयाचा आनंद द्विगुणित केला आहे.
आशिया चषक जिंकूनही भारताने मोहसिन नक्वींकडून नाकारली ट्रॉफी
दरम्यान, मीमचा भाग सोडता दुबईतील सामन्यातून मोठी घडामोड समोर आली आहे. मैदानावर पुन्हा एकदा मोठा वाद पाहायला मिळाला. एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या वर्षी पुरुष आशिया चषकातही भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. महिला संघानेही तोच कडक पवित्रा कायम ठेवला. या नकारामुळे आयोजकांनी ट्रॉफी न देताच घाईघाईत बक्षीस वितरण सोहळा संपवला. अखेर अधिकृत चषकाशिवायच भारतीय महिलांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला.
