डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा अपेक्षाभंग, भारतीय वंशाच्या महिलेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर
नोबेल समितीने २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवनेथम नावी पिल्लई यांना जाहीर केला आहे, ज्यांना शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सन्मानित केले जाईल.

नोबेल समितीने २०२६ चा शांतता पुरस्कार नवनेथम नवी पिल्लई यांना जाहीर केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा सोशल मीडियावरुन करण्यात आली आहे. पिल्लई यांनी शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पिल्लई यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारण्याची वारंवार इच्छा व्यक्त करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीही तो मिळाला नाही. तमिळ वंशाचे असलेल्या नवनेथम यांनी दक्षिण आफ्रिकेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून आणि रवांडा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
BREAKING NEWS
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2026 #NobelPeacePrize to Navanethem “Navi” Pillay for her efforts to promote peace and international law.#NobelPrize https://t.co/97vurspw6z
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2026
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या पण मूळच्या भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्लई यांनी वर्णवादा विरुद्ध संघर्ष करणाऱ्या नेल्सन मंडेला यांच्यासह अनेकांच्या संदर्भातील कायद्याची लढाई लढली आहे. त्यांनी गाजामध्ये इजरायली सैन्याने केलेल्या कारवाईविरुद्धही सातत्याने सवाल उपस्थित केले आहेत. एवढच नाही तर त्यांनी युद्धांमध्ये होणारे नरसंहार, गन्हेगारी कृत्ये आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केलं आहे.
नावी पिल्लई यांनाच नोबेल का मिळाले?
त्यांनी युद्धगुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार यांच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाईला पुढे नेण्यासाठी योगदान दिले. रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून, त्यांनी अशा कायदेशीर निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे लैंगिक हिंसाचाराला मानवतेविरुद्धचा गुन्हा आणि नरसंहार म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रचाराद्वारे नरसंहारास चिथावणी दिल्याबद्दल एखाद्या व्यक्तीवर खटला चालवण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण कायदेशीर विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय तमिळ वंशाच्या कुटुंबात जन्मलेल्या
पिल्लई यांना वर्णभेदाच्या काळात भेदभाव आणि असमानतेचा सामना करावा लागला. पुढे, वकील आणि न्यायाधीश म्हणून त्यांनी समान हक्क आणि न्यायासाठी काम केले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे उच्च न्यायालय, रवांडासाठीचे आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषवली. सामायिक केलेल्या मजकुरात म्यानमारविरुद्धच्या नरसंहार प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचाही उल्लेख आहे.
शक्तिशाली देशांनाही कायद्याच्या कक्षेत आणण्याचा पाठपुरावा
त्यांना शांतता पुरस्कार देण्याच्या या घोषणेमागील मूळ कल्पना जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की, जगात शांतता केवळ लष्करी सामर्थ्याने किंवा शक्तिशाली देशांच्या निर्णयांद्वारे नव्हे, तर कायदा, न्याय आणि उत्तरदायित्वाच्या माध्यमातून प्रस्थापित केली जाऊ शकते.
शांततेशी पुरस्कार देण्यामागचा तर्क
चिरस्थायी शांततेसाठी न्याय अत्यावश्यक आहे. जर युद्ध, नरसंहार आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले गेले, तरच पीडितांना न्याय मिळण्याची आणि भविष्यातील हिंसाचार रोखण्याची शक्यता बळकट होते, असा या पुरस्कारामागील घोषित तर्क असा आहे.