31 चेंडूत 10 षटकारांसह 83 धावा, पोलार्डच्या वादळाने मुंबई जिंकली!

31 चेंडूत 10 षटकारांसह 83 धावा, पोलार्डच्या वादळाने मुंबई जिंकली!

MIvKXIP मुंबई : शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन गडी राखून विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएल 2019 च्या 24 व्या सामन्यात मुंबईने पंजाबवर थरारक विजय मिळवला. मुंबईचा हंगामी कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) या मॅचचा शिल्पकार ठरला. पोलार्डने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत, अवघ्या 31 चेंडूत घणाघाती 83 धावा ठोकल्या. त्यामुळेच मुंबईला अशक्यप्राय विजय शक्य झाला. दुसरीकडे पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या जोडीने 12.5 ओवरमध्ये 116 धावांची भागीदारी केली. सलामीवीर ख्रिस गेल याने 36 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 7 षटकाराच्या सहाय्याने त्यांने 63 धावा केल्या. तर लोकेश राहुलने 64 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला निर्धारित 20 षटकात 4 बाद 197 धावा करता आल्या. पंजाबकडून  डेव्हिड मिलर 8 धावा, करुण नायर 5 धावा, सॅम कुरेन 8 धावा केल्या.

पंजाबचं 198 धावांचं आव्हान घेऊन मुंबई इंडियन्सचे सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सिद्धेश लाड मैदानात उतरले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर सिध्देश लाडने पहिल्या चेंडूवरच षटकार लगावला. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. सिद्धेश 13 चेंडूत 15 धावा करुन माघारी परतला.

त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव 21, क्विंटन डी कॉक 24 आणि इशान किशन 7 धावा करत माघारी परतले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या या दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. यामुळे मुंबई 100 धावांवर पोहोचली.

किरॉन पोलार्डने दमदार खेळी करत 31 चेंडूत 10 षटकार आणि तीन चौकारांच्या सहाय्याने 83 धावा केल्या. किरॉन पोलार्डने केलेल्या या दमदार कामगिरीमुळे मुंबई जिंकेल असे सर्वांना वाटत होते. मात्र असे असताना शेवटच्या ओवरमध्ये मुंबईला 4 चेंडूत 4 धावांची गरज असताना पोलार्ड बाद झाला आणि मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली. पोलार्ड बाद झाल्यानंतर मुंबईला जिंकण्यासाठी चार चेंडूत चार धावांची गरज होती. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या अल्झारी जोसेफ मैदानात आला. मुंबईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती. त्यावेळी जोसेफने अंकित राजपूतच्या चेंडूवर 2 धावा घेत, मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार कामगिरी केली. सलामीसाठी मैदानात उतरलेल्या राहुलने 6 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने शतक झळकवले. विशेष म्हणजे लोकेश राहुलचे आयपीएलच्या कारकीर्दीतील हे पहिले शतक आहे. मात्र त्याने केलेली ही शतकी खेळी वाया गेली. मुंबई इंडियन्सने 7 बाद 198 धावा करत विजय मिळवला. या विजयामुळे आयपीएल गुणतालिकेत मुंबईने पाचव्या स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.