VIDEO: रोहित शर्माकडून बॅट कडेवर घेऊन अर्धशतक मुलीला समर्पित!

VIDEO: रोहित शर्माकडून बॅट कडेवर घेऊन अर्धशतक मुलीला समर्पित!

IPL 2019 मुंबई :  रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. वानखेडेवर रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईने दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 9 विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे कोलकाताचा आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने 20 षटकात 7 बाद 133 धावा केल्या होत्या. मुंबईने हे आव्हान 1 विकेट्सच्या मोबदल्यात 16.1 षटकात सहज पार केलं. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 55 धावा तर सूर्यकुमार यादवने नाबाद 46 धावा करुन विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी लसिथ मलिंगा (35 धावात 3 विकेट), जसप्रीत बुमराह (31 धावात 2 विकेट) आणि हार्दिक पांड्या (20 धावात 2 विकेट) यांच्या धारदार गोलंदाजीपुढे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

अर्धशतक मुलीला समर्पित

दरम्यान, रोहित शर्माने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रोहितने 48 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या. हे अर्धशतक रोहितने मुलगी समायराला समर्पित केलं. अर्धशतक ठोकल्यानंतर रोहितने एखाद्या बाळाला कडेवर घ्यावं, तसं बॅट कडेवर घेऊन सेलिब्रेशन केलं आणि अर्धशतक मुलीच्या नावे समर्पित केलं.

हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह मुलगी समायराला घेऊन वानखेडे मैदानात आली होती.

हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा आपल्या चिमुकलीला कडेवर घेऊन मैदानात आला. मैदानावर येऊन थेट तो खाली बसला आणि समायरासोबत खेळू लागला. यावेळी रितीकाही मैदानात आली आणि तिने फॅमिली सेल्फी घेतला. हा गोड क्षण मुंबई इंडियन्ससह कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनीही अनुभवला. मुंबई इंडियन्सने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या 

PHOTO: अर्धशतक लेकीला समर्पित, रोहित शर्माच्या लेकीचे गोड फोटो