उमेश यादवच्या बचावासाठी जसप्रीत बुमराहची मैदानात उडी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:13 PM, 25 Feb 2019
उमेश यादवच्या बचावासाठी जसप्रीत बुमराहची मैदानात उडी

विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 14 धवांची गरज होती, पण उमेश यादवच्या ढिसाळ गोलंदाजीमुळे भारताला हा सामना वाचवता आला नाही.  यामुळे उमेश यादवला क्रिकेट चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. मात्र उमेश यादवच्या बचावासाठी जसप्रीत बुमराह मैदानात उतरला आहे. बुमराहने आपल्या सहकाऱ्याची बाजू घेत कधीतरी असा दिवस येतो, त्या दिवशी शेवटच्या षटकातील रणनीती अपयशी ठरते, असं बुमराह म्हणाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 14 धावांची गरज असताना शेवटच्या षटकात उमेश यादवने ढिसाळ गोलंदाजी केली.  त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतावर विजय मिळवणे सोपे झाले. या सामन्यात 19 व्या षटकात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत केवळ दोन धावा देत, दोन बळी घेतले. मात्र शेवटच्या षटकात उमेश यादवच्या असामाधानकारक कामगिरीमुळे भारताला पराभव पत्कारावा लागला.

त्यामुळे उमेश यादववर चौफेर टीका होत आहे. त्याबाबत बुमराहला विचारलं असता तो म्हणाला, “कधी कधी असं होते, कोणत्याही परिस्थितीतपेक्षा शेवटच्या षटकादरम्यान गोलंदाजी करणे हे खूप कठीण असते. यावेळी दोन्ही बाजूने निकाल जाऊ शकतो किंवा विजयी होण्याची शक्यता 50-50 असते. तुम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करता,  तुमचे उद्दीष्ट स्पष्ट असते. मात्र कधी कधी यश मिळते, तर कधी मिळत नाही. यामध्ये चिंता करण्यासारखी गोष्ट नाही”.

काहीवेळा तुम्ही ठरवलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी करत असता, पण कधीकधी ती रणनीती अपयशी ठरते, असं बुमराहने नमूद केलं. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिला फायदा त्यांना मिळाला, असंही बुमराहने नमूद केलं.