अश्विनच्या पंजाबला ‘ती’ चूक महागात, रसेलची पुन्हा वादळी खेळी

अश्विनच्या पंजाबला 'ती' चूक महागात, रसेलची पुन्हा वादळी खेळी

KXIP vs KKR कोलकाता: आयपीएलमध्ये  किंग्ज इलेव्हन पंजाबला (KXIP) नाणेफेक जिंकूनही कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. या पराभवात अश्विनच्या पंजाब संघाची एक चूक त्यांना चांगलीच महाग पडल्याचे पाहायला मिळाले.

कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएलच्या या सत्रातील हा दुसरा विजय आहे. या दुसऱ्या विजयाला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या क्षेत्ररक्षणातील एका चुकीनेही हातभार लावला. ही चूक होती मैदानावरील आतील वर्तुळात 3 खेळाडू उभे करणे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन्ही सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. मात्र, ते जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाही. यानंतर आलेल्या रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांनीही धावांचा पाऊस सुरु ठेवत कोलकात्याची धावसंख्या पुढे नेली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 110 धावांची दमदार खेळी केली. यात राणाने 34 चेंडूत 63 धावा केल्या. सामन्याच्या 15 व्या षटकात राणा बाद झाला. त्यानंतर नाईट रायडर्सच्या संघातील अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आला. तो अधिक काही करेल याआधीच मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. मात्र, मैदानाच्या आतील वर्तुळात 3 खेळाडू उभे असल्याने तो चेंडू बाद झाला. त्यामुळे रसेलला जीवनदान मिळाले.

यानंतर मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत रसेलने 17 चेंडूंमध्ये 48 धावांचा पाऊस पाडला. रसेलच्या या खेळीने कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 218 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाकडून ख्रिस गेलनेही चांगली सुरुवात केली. मात्र, त्याचा धोका दिसताच गेलचा वेस्ट इंडिजचा साथीदार रसेलने त्याला बाद केले.

यानंतर पंजाबकडून  मयांक अग्रवाल आणि डेविड मिलर यांनी 5 व्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करत पंजाबच्या सामन्यातील विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. दोघांनी अर्धशतकं ठोकली. मयांक 34 चेंडूत 58 धावा करुन माघारी परतला. तर डेविड मिलर 40 चेंडूत 59 धावा करुन नाबाद राहिला. पंजाबला कोलकाताचं 219 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. त्यांना 20 षटकात 4 बाद 190 धावांपर्यंतच मजल मारता आली.

का दिला नो बॉल?

नियमांनुसार पंजाबला त्यावेळी मैदानाच्या आतील वर्तुळात 4 खेळाडू ठेवणे अनिवार्य होते. मात्र, तसे न करता केवळ 3 खेळाडू उभे केल्याने अम्पायरने नो बॉल दिला. विशेष म्हणजे मागील सामन्यात पंजाबचा कर्णधार अश्विनने ‘मंकडिंग‘चा उपयोग करत जोस बटलरला धावबाद केले होते. यावर स्पष्टीकरत देताना अश्विनने म्हटले होते, नियम जे सांगत आहे, तेच व्हायला हवे आणि मी काहीही चूक केले नाही. याचा खेळातील मुळ भावनेशी काहीही संबंध नाही. यावेळी मात्र खेळातील नियम अश्विनच्या संघाला चांगलेच महागात पडले.

Published On - 11:23 am, Thu, 28 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI