IPL 2025 MI : प्लेऑफआधी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी, चाहत्यांच वाढलं टेन्शन
IPL 2025 MI : प्लेऑफआधी मुंबई इंडियन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. नक्कीच यामुळे चाहत्यांच टेन्शन वाढणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला पुढचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील.

IPL 2025 चा सीजन रोमांचक वळणावर आहे. प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे काही सामने गमावले. पण नंतर आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावत लौकीकाला साजेसा खेळ केला. आता प्लेऑफआधी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी आहे. सीजन सुरु असतानाच तीन खेळाडूंनी टीमची साथ सोडली आहे. राष्ट्रीय कर्तव्यामुळे त्यांना मायदेशी परतावं लागलं आहे. मुंबई इंडियन्ससाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. मुंबई इंडियन्सने या तीन खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा आधीच केली आहे. MI ने सोशल मीडियावर पोस्ट करत या तीन खेळाडूंना निरोप दिला.
मुंबई इंडियन्सचे हे तिन्ही खेळाडू महत्त्वाचे होते. विकेटकिपर फलंदाज रायन रिकल्टन, ऑलराउंडर कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स यांना नॅशनल ड्यूटीमुळे मायदेशी परतावं लागलय. या तिन्ही खेळाडूंनी चालू सीजनमध्ये मुंबईसाठी महत्त्वाच योगदान दिलं होतं. आता टुर्नामेंटमधील उर्वरित सामन्यांचा ते भाग नसतील. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली.
का मायदेशी परतले?
रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टीमचा भाग आहेत. विल जॅक्सचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणून हे तिन्ही खेळाडू मायदेशी निघून गेले आहेत. टीमने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात हेड कोच महेला जयवर्धने यांनी या खेळाडूंना निरोप दिला. “मी स्टाफ आणि टीमच्यावतीने रायन आणि बोस्कीला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी शुभेच्छा देतो. चांगलं खेळा. तुम्ही शानदार प्रदर्शन केलय. तुम्हाला जाताना पाहून दु:ख होतय. पण तुम्हाला शुभेच्छा” असं जयवर्धने यांनी आफ्रिकी क्रिकेटपटूंसाठी म्हटलं आहे.
View this post on Instagram
या तिघांची जागा कोण घेणार?
रायन रिकल्टन मुंबईकडून सलमीला यायचा. त्याने अनेक सामन्यात दमदार सलामी दिली. रायन रिकल्टनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकदा टीमला अडचणीतून बाहेर काढलं. कॉर्बिन बॉशने आपल्या ऑलराऊंडर क्षमतेने टीमच संतुलन वाढवलं. विल जॅक्सने सुद्धा मीडिल ऑर्डरमध्ये वेगाने धावा बनवल्या. त्यामुळे निश्चित प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला या तीन खेळाडूंची कमतरता जाणवू शकते. या तिघांच्या जागी मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा अनुभवी विकेटकिपर फलंदाज जॉनी बेयरस्टो, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंका यांचा टीममध्ये समावेश केला आहे.
