Divya Deshmukh : चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत, पाहा व्हीडिओ

Divya Deshmukh Grand Welcome At Nagpur : बुद्धीबळ विश्वविजेती दिव्या देशमुख हीचं काही वेळापूर्वी नागपूर विमानतळावर आगमन झालं. त्यावेळेस दिव्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दिव्याने वयाच्या अवघ्या 19 वर्षी चेस वूमन्स वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय.

Divya Deshmukh : चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत, पाहा व्हीडिओ
Divya Deshmukh Welcome at Nagpur
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 30, 2025 | 10:35 PM

नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुख हीने सोमवारी 28 जुलैला जॉर्जियामधील बाटुमी येथे अंतिम सामन्यात बाजी मारत फिडे वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. दिव्याने फायनलमध्ये भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत करत इतिहास घडवला. दिव्या यासह चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. तसेच दिव्याने ग्रँडमास्टर होण्याचा बहुमानही मिळवला. दिव्याचं या कामगिरीनंतर भारतात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर दिव्या स्वगृही अर्थात नागपुरात पोहचली. दिव्याचं ग्रँडमास्टर झाल्यानंतर नागपूरच्या विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेस दिव्याच्या स्वागतसाठी विमानतळावर एकच गर्दी पाहायला मिळाली. दिव्याच्या स्वागतासाठी विमानतळावर शाळकरी विद्यार्थी आणि चेसचाहते उपस्थित होते.

नागपूर विमानतळावर पोहचताच दिव्याचं उपस्थितांनी स्वागत केलं. दिव्याला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच दिव्याला हार घातला. यावेळेस दिव्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांची एकच झुंबड पाहायला मिळाली. यावेळेस मोठ्या प्रमाणात चाहतेही उपस्थित होते. दिव्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक चाहत्यांची धावपळ पाहायला मिळाली.

वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात स्वागत

दिव्याची पहिली प्रतिक्रिया

दिव्याने स्वागतानंतर माध्यमांशी संवाद साधला. दिव्याने यावेळेस उपस्थित चाहत्यांचे आभार मानले. तसेच दिव्याने तिच्या या विजयाचं श्रेय कुटुंबियांना आणि तिच्या पहिल्या प्रशिक्षकांना दिलं.

“मी आनंदी आहे. माझ्या स्वागतसाठी इतके लोक इथे जमले आहेत हे पाहून मला खूप बरं वाटलं. मी खूप आनंदी आहे. मी माझ्या बहिणीला, कुटुंबाला आणि माझे पहिले प्रशिक्षक राहुल जोशी यांना या विजयाचं श्रेय देऊ इच्छिते”, असं दिव्या म्हणाली.

नागपुरात 2 ऑगस्टला भव्य सत्कार

दरम्यान दिव्या देशमुख हीचा 2 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील सुरेश भट सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता सत्कार केला जाणार आहे. यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. तसेच यावेळेस नागपूर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना उपस्थिती लावणार आहेत.