मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चेस वर्ल्ड चॅम्पियन Divya Deshmukh बाबत मोठी घोषणा, म्हणाले…
CM Devendra Fadnavis On Divya Deshmukh : नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुख हीने वर्ल्ड चेस चॅम्पियन 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरु हंपीला पराभूत करत इतिहास रचला. दिव्याने यासह पहिली महिला चेस वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचं अभिनंदन करत मोठी घोषणा केली.

नागपूरच्या दिव्या देशमुख हीने तिच्यापेक्षा वयाने अनेक वर्षांनी मोठ्या असलेल्या कोनेरू हंपी हीचा अंतिम सामन्यात पराभव करत वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. दिव्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हा कामगिरी केली आणि इतिहास घडवला. दिव्याच्या या कामगिरीनंतर तिचं अभिनंदन केलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या या मुलीचं पत्रकार परिषद घेत अभिनंदन केलं. फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत खेळाडूंसाठी काही नवीन योजना राबवता येतील काही हे पाहू, असंही म्हटलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिव्याबाबत मोठी घोषणा केली.
फडणवीस काय म्हणाले?
दिव्याने अंतिम सामन्यात भारताच्याच कोनेरू हंपी हीला पराभूत केलं. दिव्याने यासह चेस वर्ल्ड कप जिंकत भारतासह महाराष्ट्राचं नाव उंचावलं. “मला अतिशय आनंद आहे की नागपुरची आणि महाराष्ट्राची दिव्या देशमुख हीने बुद्धीबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. दिव्याने ग्रँडमास्टरचा खिताबही प्राप्त केला आहे. दिव्या या स्पर्धेत विजय मिळवणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. दिव्याने याआधीही भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. दिव्याने अनेक स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिव्याने जवळपास 35 पदकं जिंकली आहेत. त्यात 23 सुवर्ण पदकांचा समावेश आहे”, असं म्हणत फडणवीस यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुकं केलं. तसेच फडणवीसांनी उपविजेत्या कोनेरू हंपी यांचंही अभिनंदन केलं.
“दिव्याने कोनेरू हंपी यांना पराभूत केलं आहे. मी हंपी यांचंही अभिनंदन करतो. त्याही फार चांगल्या खेळाडू आहेत. मात्र नागूपरकरांकरता आणि महाराष्ट्रासाठी दिव्या देशमुख कमी वयात किताब मिळवते आणि जागतिक पातळीवर अशी कामगिरी करते ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही निश्चितपणे त्यांचा सन्मान करु”, असं फडणवीस यांनी म्हटलं.
“ज्या खेळाडूंनी महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलं आहे, त्यांचा निश्चितपणे उचित सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्यासह चर्चा करुन त्यांचा सन्मान कसा करायचा हे ठरवू”, असं फडणवीस यांनी म्हटलं.
“तसेच या संदर्भात काही योजना आखायची आवश्यकता असेल तर निश्चितच आखू. आपले खेळाडू ज्या खेळात उत्तम खेळतायत, त्यात त्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी वातावरण तयार झालं पाहिजे, अशाप्रकारचा आपला प्रयत्न असेल”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना मदत करण्याबाबत आश्वस्त केलं.
