Divya Deshmukh : महाराष्ट्राची दिव्या देशमुख वर्ल्ड चेस चॅम्पियन, फायनलमध्ये कोनेरू हंपी हीचा पराभव करत घडवला इतिहास
FIDE Womens World Chess Championship Final Match Result : 19 वर्षीय भारतीय युवा चेस चॅम्पियन दिव्या देशमुखने FIDE वूमन्स वर्ल्ड कप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलीय. दिव्याने अंतिम सामन्यात भारताच्याच कोनेरू हंपीचा पराभव केला.

क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हीचा पराभव करत हा कारनामा केला आहे. दिव्या यासह वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्याआधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती. दिव्याच्या या विजयानंतर तिचं सोशल मीडियावर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं. मात्र दोघीपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? याची उत्सूकता होती. मात्र दिव्याने चाली करत कोनेरुला पराभवाची धुळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला कोनेरु हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय.
टायब्रेकरमध्ये दिव्या विजयी
दिव्या आणि कोनेरु यांच्यातील अंतिम फेरीतील 2 सामने बरोबरीत राहिले. अंतिम फेरीतील पहिला सामना शनिवारी 26 जुलैला झाला. दिव्याला तेव्हाच वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. मात्र दिव्याकडून अखेरच्या क्षणी चूक झाली. कोनेरुने याचाच फायदा घेत कमबॅक केलं आणि अंतिम फेरीतील पहिला सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. त्यानंतर रविवारी 27 जूलैला अंतिम फेरीतील दुसरा सामनाही बरोबरीत सुटला. दुसरा सामनाही 1-1 ने बरोबरीत सुटला. त्यामुळे आता ट्रायब्रेकरने विजेता निश्चित होणार असल्याचं स्पष्ट झालं.
दिव्या देशमुख 19 वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियन
🇮🇳 Divya Deshmukh, just 19 years old, is the Winner of the 2025 FIDE Women’s World Cup! 🏆
With this incredible victory, she: ✨ Becomes a Grandmaster ✨ Secures a spot at the next Women’s Candidates#FIDEWorldCup @DivyaDeshmukh05 pic.twitter.com/fNlkRrzvr1
— International Chess Federation (@FIDE_chess) July 28, 2025
अंतिम फेरीतील दोन्ही सामने हे क्लासिकल फॉर्मेटमध्ये खेळवण्यात आले. मात्र टायब्रेकर रॅपिड फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार होता. कोनेरुला या फॉर्मेटमध्ये दिव्याच्या तुलनेत फार अनुभव आहे. त्यामुळे टायब्रेकरमध्ये कोनेरु दिव्यावर वरचढ ठरण्याची शक्यता होती. मात्र दिव्याने गेम फिरवला.
दिव्याने आज सोमवारी 28 जुलैला ट्रायब्रेकरमध्ये सामना एकतर्फी केला. दिव्याने कोनेरुला चाली करत करत चुका करण्यास भाग पाडलं. दिव्याने यासह कोनेरुला मागे टाकलं आणि इतिहास घडवला. दिव्या यासह भारतासाठी चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला ठरली. विशेष म्हणजे दिव्या आता चौथी महिला ग्रँडमास्टर ठरणार आहे. विशेष म्हणजे दिव्याने ही कामगिरी भारताची पहिल्या ग्रँडमास्टरला पराभूत करत केली.
