
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हॉकी आशिया कप स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेत आपला विजयी झंझावात कायम ठेवला आहे. भारताने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने चीननंतर आता जपानवर मात करत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने जपानला 3-2 अशा फरकाने नमवलं आहे. भारताने यासह आपली विजयी घोडदौड कायम ठेवलीय. त्यामुळे आता भारताकडे साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कझाकिस्तानवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
हॉकी आशिया कप स्पर्धेतील सर्व सामन्यांचं आयोजन हे बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. भारताने 29 ऑगस्टला चीन टीमवर मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर आज 31 ऑगस्टला जपानला लोळवलं. भारताला जपान विरुद्ध काहीवेळ संघर्ष करावा लागला. जपानने जोरदार झुंज दिली. मात्र भारतानेच मैदान मारलं. टीम इंडियाने यासह ए ग्रुपमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.
भारताने या सामन्याची अफलातून सुरुवात केली. भारतान पहिल्याच 5 मिनिटांमध्येच 2 गोल ठोकले. भारताने यासह 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. भारतासाठी मंदीप सिंह याने पहिला गोल (चौथ्या मिनिटाला) करत भारताचं खातं उघडलं. त्यानंतर दुसऱ्याच अर्थात पाचव्या मिनिटाला कॅप्टन हरमनप्रीतने गोल केला आणि भारताची आघाडी आणखी मजबूत केली. भारताने पहिल्या सत्रापर्यंत 2-0 अशा फरकाने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलं.
जपानने दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर हरमनप्रीतने पेन्लटी कॉर्नरद्वारे भारतासाठी एकूण तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. भारताने यासह पुन्हा 2 गोलने आघाडी मिळवली. जपानने 59 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे जपानच्या आशा वाढल्या होत्या. मात्र भारताने अखेरच्या क्षणी जपानला रोखलं आणि सामना 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केला. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे.
भारताची सुपर 4 मध्ये एन्ट्री
INTO THE SUPER 4s! 🤩#HockeyIndia #IndiaKaGame #HumSeHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/MWvq65UOVZ
— Hockey India (@TheHockeyIndia) August 31, 2025
दरम्यान कझाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हा सामना सोमवारी 1 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय संघ या सामन्यात कझाकिस्तान लोळवत विजयी हॅटट्रिक करणार का? याकडे हॉकी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.