वेस्ट झोन बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, गुजरात-छत्तीसगडनेही मिळवलं यश
योनेक्स सनराइज वेस्ट झोन इंटर स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेची सांघिक अंतिम फेरी नुकतीच पार पडली. गोवा बॅडमिंटन असोसिएशनने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने या प्रतिष्ठित अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि यजमान गोवा येथील सर्वोत्तम शटलर्सना एकत्रित करून प्रतिभेचे शानदार प्रदर्शन केले आहे.

वेस्ट झोन बॅडमिंटन स्पर्धेचा निकाल अखेर लागला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात आणि छत्तीसगडने विजयी पताका फडकवली. महाराष्ट्राच्या पुरुष सांघिक आणि ज्युनियर मुलींच्या सांघिक गटाने बाजी मारली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने छत्तीसगडवर 3-1 असा विजय मिळवला. छत्तीसगडच्या रौनक चौहानने महाराष्ट्राच्या वरूण कपूरला 8-21, 15-21 असं पराभूत केलं होतं. पण त्यानंतर महाराष्ट्राने जबरदस्त कमबॅक केलं. दर्शन पुजारीने हर्षित ठाकूरचा 21-15, 21-16 असा पराभव केला, तर दुहेरीत विप्लव कुवळे आणि विराज कुवळे या जोडीने एमव्ही अभिषेक आणि सुजे तांबोळी या जोडीवर 21-11, 18-21, 21-14 अशी मात केली. तिसऱ्या एकेरीत संकल्प गुरालाने हर्षल भोयरवर 21-13, 21-14 असा विजय मिळवून महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ज्युनियर मुलींच्या संघाने अंतिम फेरीत महाराष्ट्राने छत्तीसगडला 2-1 असा चुरशीच्या लढतीत हरवले. तनू चंद्राने रिधीमा सरपतेवर 21-11, 21-7 असा विजय मिळवला होता. त्यामुळे महाराष्ट्राचा संघ बॅकफूटवर गेला होता. परंतु श्रावणी वाळेकर आणि तारिनी सुरी यांनी श्वेता परदेशी आणि तनू चंद्रा यांना 21-16, 21-17 असा पराभव करून महाराष्ट्राला कमबॅक करून दिलं. तर निर्णायक सामन्यात प्रकृती शर्माने रेणुश्री श्यामलाराव यवर्णाचा 21-16, 19-21, 21-17 असा पराभव करून महाराष्ट्राला ज्युनियर मुलींचा किताब मिळवून दिला.
महिला संघाच्या अंतिम फेरीत गुजरातने महाराष्ट्राचा 3-2 असा धुव्वा उडवला. गुजरातची दिग्गज शटलर तसनीम मीरने साद धर्माधिकारीविरुद्ध 21-13, 21-12 असा विजय मिळवला, त्यानंतर आदिता रावने पूर्वा बर्वेविरुद्ध 21-16, 21-17 असा विजय मिळवला. महाराष्ट्राने अनघा करंदीकर आणि सिया सिंग यांच्या जोडीने पुनरागमन केले. त्यांनी शेनन ख्रिश्चन आणि युती गज्जर यांचा 21-16, 21-10 असा पराभव केला, तर तनिष्का देशपांडेने ऐशानी तिवारीवर 21-14, 21-16 असा विजय मिळवत बरोबरी साधली. पण आदिता राव आणि तस्नीम मीर या गुजरात जोडीने अंतिम दुहेरीत श्रुती मुंदडा आणि तनिष्का देशपांडे यांचा 21-18, 21-14 असा पराभव करून गुजरातला विजेतेपद मिळवून दिले.
ज्युनियर मुलांच्या संघाच्या अंतिम सामन्यात, छत्तीसगडने महाराष्ट्राचा 2-0 असा पराभव केला. स्टार शटलर रौनक चौहानने भारताच्या नंबर 1 अंडर 17 खेळाडू देव रूपारेलियावर 21-16, 19-21, 21-17 असा रोमांचक तीन सेटरच्या सामन्यात विजय मिळवला, त्यानंतर दिव्यांश अग्रवाल आणि सौरव साहू या दुहेरी जोडीने अर्जुन बिराजदार आणि आर्यन बिराजदारवर 21-17,21-12 असा विजय मिळवला. दुसरीकडे, यजमान गोव्याने पुरुष, महिला आणि ज्युनियर मुलांच्या सांघिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकून लढाऊ कामगिरीने प्रभावित केले.
