Vijay hazare trophy 2025-26 : विजयासाठी 6 धावा, लास्टची मेडन ओव्हर, गोव्याच्या तोंडून विजयाचा घास हिरावणारा महाराष्ट्राचा जादुई गोलंदाज कोण?
Vijay hazare trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये महाराष्ट्राच्या टीमने गोव्यावर रोमांचक विजय मिळवला. लास्ट ओव्हरमध्ये गोव्याला विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या एका गोलंदाजाने कमाल केली. त्याने 0,0,0,0,0,0 अशी मेडन ओव्हर टाकली. हा गोलंदाज कोण आहे?

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 टुर्नामेंटच्या एलीट ग्रुप सी मध्ये एका हाय-वोल्टेज सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राने गोव्याला 5 धावांनी हरवलं. हा सामना म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेशर झेलण्याची परीक्षा होता. महाराष्ट्राचा ऑलराऊंडर रामकृष्ण घोषने शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीच प्रदर्शन करुन टीमला विजय मिळवून दिला. रामकृष्ण घोषने जादुई गोलंदाजी केली. गोव्याच्या टीमकडून विजय हिरावून घेतला. महाराष्ट्राला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.
या मॅचमध्ये महाराष्ट्राने पहिली गोलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 249 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडचं शतक होतं. ऋतुराज गायकवाड या मॅचमध्ये 134 धावांची कॅप्टन इनिंग खेळला. विक्की ओस्तवालने 53 धावांचं योगदान दिलं. प्रत्युत्तर म्हणून गोव्याने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी कश्यप बखाले आणि स्नेहल कौथंकरसोबत 83 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर डाव गडगडला. बघता, बघता टीमने 221 धावांवर 9 विकेट गमावले.
या गोलंदाजाने प्रत्येकाचं लक्ष वेधलं
यानंतर ललित यादवने गोव्याचा डाव संभाळण्याचं काम केलं. 67 चेंडूत नाबाद 57 धावा बनवल्या. वासुकी कौशिकने सुद्धा एक बाजू लावून धरली. पण ही जोडी टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. गोव्याच्या टीमचं टार्गेट 5 धावांनी हुकलं. याचं मुख्य कारण ठरलं रामकृष्ण घोषचे ते 6 जादुई चेंडू. या गोलंदाजाने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं.
दबावाखाली गोलंदाजी करताना शानदार प्रदर्शन
मॅचमध्ये खरी रंगत लास्ट ओव्हरमध्ये दिसली. गोव्याला विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता होती. त्यांचा एक विकेट शिल्लक होता. या अशा नाजूक क्षणी चेंडू रामकृष्ण घोषच्या हाती सोपवला. घोषने दबावाखाली गोलंदाजी करताना शानदार प्रदर्शन केलं. संपूर्ण ओव्हरमध्ये एकही रन्स दिला नाही. लास्ट ओव्हर मेडन टाकून महाराष्ट्राला 5 धावांनी संस्मरणीय विजय मिळवून दिला. रामकृष्ण घोष या सामन्यातील सर्वात किफायती गोलंदाज ठरला. त्याने 10 ओव्हरमध्ये 35 धावा देऊन एक विकेट घेतला.
CSK कडून खेळताना दिसणार
रामकृष्ण घोष आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. रामकृष्ण घोष आयपीएल 2025 पासून सीएसके टीममध्ये आहे. त्यावेळी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर 30 लाख रुपये खर्च केले होते. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, तरीही त्याला आयपीएल 2026 साठी रिटेन करण्यात आलं. टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावरील जो विश्वास आहे, त्यावरुन यावर्षी त्याला आयपीएल डेब्युची संधी मिळू शकते.
