Rohit Sharma : रोहित शर्माच्या डोक्यात काय सुरू होतं ? 2 महीने आधीच टेस्टमधून घेणार होता संन्यास..
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो भारताचे नेतृत्व करत राहील. खरंतर, 2 महिन्यांपूर्वीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची मानसिक तयारी केली होती, असे एका रिपोर्टमध्ये उघड झालं आहे.

7 मे 2025, संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांची वेळ. याच वेळी भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने टेस्ट कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पण रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नाही तर संपूर्ण कसोटी क्रिकेट सोडले. त्याने क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता पीटीआयच्या एका वृत्तानुसार, रोहितने आता ज्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, तो निर्णय रहित 2 महिन्यांपूर्वीच अंमलात आणणार होता. म्हणजेच, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यामागील त्याचा विचार अगदी स्पष्ट होता. रोहित शर्माचा तो विचार काय होता? तेव्हा त्याच्या मनात काय चालले होते? असा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे.
2 महिन्यांआधीच केली होती निवृत्तीची मानसिक तयारी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 9 मार्च 2025 रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. ते विजेतेपद जिंकल्यानंतरच रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. रोहितच्या जवळच्या सूत्रांकडून पीटीआयला या निर्णयाची माहिती मिळाली. वर्ल्ड कपचे एक नवीन चक्र सुरू होत असल्याने, रोहितला निवृत्तीची हीच योग्य वेळ वाटली, असेही सूत्रांनी सांगितले. म्हणजे, तो निर्णय घेताना रोहितने टीम इंडियाचे हित लक्षात ठेवले होते. नवीन सायकलमध्ये, एका नवीन कर्णधाराला, एका तरुण खेळाडूला संधी मिळावी, जो भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाऊ शकेल असे त्याला वाटत होतं.
सिलेक्शनसाठी निवड समिती सदस्य होते दुविधेत, रोहितने टेन्शनचं दूर केलं !
मात्र, रोहित शर्माला बारकाईने फॉलो करणाऱ्या अनुसरण करणाऱ्या बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला की जर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याला संघातून वगळण्याची चर्चा कशी झाली?अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती रोहितच्या संघात निवडीबाबत दुविधेत होती, तर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक होता, असे या अहवालात पुढे म्हटले आहे. पण आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून रोहितने निवडकर्त्यांची कोंडी दूर केली आहे.
