शाहीद आफ्रिदी तब्बल 23 वर्षे खोटं बोलला, आयसीसी कारवाई करणार?

शाहीद आफ्रिदी तब्बल 23 वर्षे खोटं बोलला, आयसीसी कारवाई करणार?

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi ) तब्बल 23 वर्षे जगाला धोका दिल्याचं समोर आलं आहे. आफ्रिदीने स्वत:चं वय लपवल्याचा आरोप आहे. त्यामुळे आयसीसीने आफ्रिदीला दिलेले गौरव परत घेण्याची शक्यता आहे. आफ्रिदीने जन्मतारीख 5 वर्षांनी कमी करुन सांगितली होती. आफ्रिदी 1980 हे जन्मवर्ष सांगत होता, मात्र त्याचं खरं जन्मवर्ष 1975 आहे. आफ्रिदीने आत्मचरित्रामध्येच (shahid afridi autobiography Game Changer ) त्याचा उल्लेख केला आहे.

आफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध केवळ 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यावेळी अवघ्या 16 वर्षाच्या मुलाने हा आंतरराष्ट्रीय विक्रम केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता आफ्रिदीचं खरं वय समोर आलं आहे.

आफ्रिदीने ‘गेम चेंजर’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये आफ्रिदीने म्हटलंय, “माझा जन्म 1975 मध्ये झाला, मी त्यावेळी (शतक केलं तेव्हा) केवळ 19 वर्षांचा होतो, 16 वर्षांचा नव्हतो. अधिकाऱ्यांनी माझं वय चुकीचं लिहिलं होतं”.

आफ्रिदीने सांगितलेलं वयही भ्रम निर्माण करणारं आहे. कारण जर त्याचा जन्म 1975 मधील असेल, तर विक्रमी शतक ठोकलं त्यावेळी म्हणजेच 1996 ला त्याचं वय 21 हवं. मात्र तो 19 वर्षांचा सांगत आहेच शिवाय 16 वर्षांचा म्हणून हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय वन डेत सर्वात कमी वयात शतक

  1. शाही आफ्रिदी (पाकिस्तान): 16 वर्ष 217 दिवस (विरुद्ध श्रीलंका, 1996)
  2. उस्मान गनी (अफगानिस्तान): 17 वर्ष 242 दिवस (विरुद्ध झिम्बाब्वे, 2014)
  3. इमरान नजीर (पाकिस्तान): 18 वर्ष 121 दिवस (विरुद्ध झिम्बाब्वे, 2000)
  4. सलीम इलाही (पाकिस्तान): 18 वर्ष 312 दिवस (विरुद्ध श्रीलंका, 1995)
  5. तमीम इकबाल (बांग्लादेश): 19 वर्ष 2 दिवस (विरुद्ध आयर्लंड, 2008) (पुढे वाचा)

आफ्रिदीने संपूर्ण कारकिर्दीत वय लपवले

आफ्रिदीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत वय लपवल्याचं सिद्ध झालं आहे.क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आत्मचरित्रात त्याने खऱ्या वयाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू म्हणून आयसीसीने आफ्रिदीचा केलेला गौरव परत घेणार का असा प्रश्न आहे.

आफ्रिदीने 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आफ्रिदीने टी 20 वर्ल्डकप 2016 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

वकार युनिसवर निशाणा

आफ्रिदीने आत्मचरित्रात पाकचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिसवरही निशाणा साधला. 2016 मध्ये भारतात झालेल्या टी 20 वर्ल्डकपदरम्यान, वकार युनिस पाकिस्तानचे प्रशिक्षक होते. त्याबाबत आफ्रिदी म्हणतो, “दुर्दैवामुळे ते मी विसरु शकत नाही. वकार आणि माझा एक इतिहास आहे. त्याची सुरुवात कर्णधारपदापासून ते वसीम आक्रमसोबतच्या मतभेदापर्यंत झाली. वकार एक सामान्य कर्णधार होता, मात्र त्यापेक्षा वाईट प्रशिक्षक होता. तो त्यावेळी कर्णधाराला म्हणजेच मला समजवण्याचा प्रयत्न करत असे की काय करायला हवं. ते स्वाभाविक होतं आणि मतभेद होते”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI