
अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. दुपारचा मुहूर्त असल्याने लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे. फक्त सनई चौघड्यांचा आवाज कानी पडणं तो काय बाकी आहे. ही तयारी सुरू असतानाच काळजात धस्स करणारी बातमी समोर आली आहे. लग्नाला अवघे काही तास बाकी असतानाच स्मृतीच्या एका नातेवाईकाला अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मानधनासह त्यांचं संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झालं आहे. त्यामुळे मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
स्मृती आणि पलाश यांचा विवाह दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सांगलीत होणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातल्या मान्यवर हजर झाले आहेत. या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टीमचे खेळाडू अधिचं दाखल झाले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ गांगुली, व्ही व्ही लक्ष्मण, सोनू निगम,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे सांगलीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलं असून स्मृती मंधानाच्या फार्महाऊसला छावणीचं स्वरुप आलं आहे.
काय घडलं?
मात्र ही तयारी सुरू असतानाच लग्नात एक आक्रित घडलं आहे. स्मृती मंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकाला हार्ट अटॅक आल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सांगलीच्या समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना या नातेवाईकाला अटॅक आल्याचं सांगितलं जात आहे.
खासगी रुग्णालयात उपचार सुरु
या नातेवाईकाला उपचारासाठी सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात स्मृतीसह तिच्या कुटुंबातील सर्वच जण दाखल झाले आहेत. तसेच वऱ्हाडी मंडळीही रुग्णालयात पोहोचले आहेत. या नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंतेचं सावट पसरलं आहे.
पाहुण्यांना परत पाठवलं जातंय
स्मृतीचा होणारा नवरा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलही रुग्णालयातच आहे. मात्र, नातेवाईकाची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगितलं जात आहे. दुपारनंतर फॉर्म हाऊसची सजावट काढण्याचं काम सुरू झालं आहे. लग्नाचं संपूर्ण डेकोरेशन काढलं जात आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. त्यामुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लग्न होणार की नाही? याबाबत मानधाना कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, ज्या पद्धतीने डेकोरेशन काढलं जात आहे आणि पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे, त्यावरून विविध कयास लावले जात आहे.