भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालकांसह सहा जणांना अटक

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) म्हणजेच ‘साई’च्या संचालकांसह चार अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. भ्रष्टाचाराचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आलाय. राजधानी दिल्लीतील साई मुख्यालयावर सीबीआयने छापा टाकला आणि चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने संबंधितांना अटक केली. शिवाय इतर दोन जणही ताब्यात घेण्यात आले आहेत. सीबीआयची टीम गुरुवारी सायंकाळी पाच …

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालकांसह सहा जणांना अटक

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) म्हणजेच ‘साई’च्या संचालकांसह चार अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. भ्रष्टाचाराचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आलाय. राजधानी दिल्लीतील साई मुख्यालयावर सीबीआयने छापा टाकला आणि चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने संबंधितांना अटक केली. शिवाय इतर दोन जणही ताब्यात घेण्यात आले आहेत.

सीबीआयची टीम गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास साई मुख्यालयात पोहोचली. थकीत बिलं मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याची तक्रार मिळाली होती. यानंतर प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आणि सीबीआयने चौकशी करुन संबंधितांवर अटकेची कारवाई केली.

साईचे संचालक एस. के. शर्मा, अकाउंटंट हरिंदर प्रसाद, ललित जॉली आणि वरिष्ठ अधिकारी व्ही. के. शर्मा या चार जणांना ताब्यात घेतलंय. खाजगी कंत्राटदार मंदीप अहुजा आणि त्याचा साथीदार युनूस यांचाही अटक केलेल्या सहा जणांमध्ये समावेश आहे. 19 लाखांचं बिल मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तीन टक्के कमिशन मागितलं असल्याचा आरोप करण्यात येतोय.

सूत्रांच्या मते, हे प्रकरण सहा महिन्यांपूर्वीच समोर आलं होतं. साईच्या महासंचालकांनी याबाबत क्रीडामंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर साईसाठी स्टेशनरी, इलेक्ट्रिक साहित्य आणि फर्निचर खरेदी करण्याची जबाबदारी होती.

या कारवाईनंतर काही वेळातच क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचाराला कुठलंही स्थान नाही. तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयकडे याचा तपास दिला होता आणि काही महिन्यात तपास पूर्ण करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सीबीआयने त्यांची कारवाई केली, असं राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *