IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला ड्रॉप करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर टीम इंडियाने सोडलं मौन

IND vs SA : काल टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या मॅचमधून अक्षर पटेलला वगळण्याच्या निर्णयाची भरपूर चर्चा झाली. आता अखेर टीम इंडियाने या निर्णयावर मौन सोडलं आहे आणि आपली बाजू मांडली.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला ड्रॉप करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर टीम इंडियाने सोडलं मौन
Axar Patel
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 23, 2026 | 11:35 AM

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 राऊंडच्या पहिल्या सामन्यात काल टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर 76 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या पराजयामुळे टीम इंडियासाठी स्पर्धेतील सर्वच समीकरणं बदलली आहेत. आता टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने जिंकावेच लागतील तेही हाय रनरेट राखून. त्यामुळे वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास टीम इंडियासाठी सोपा नसेल. कालच्या महत्वाच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलला बाहेर बसवण्यात आलं. त्यासाठी रणनितीक गरज असं कारण पुढे करण्यात आलं. हा निर्णय टीम इंडियावरच उलटला असं म्हणावं लागेल. सोशल मीडियावर तशीच चर्चा आहे. या उलट अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. पण तो प्रभावी प्रदर्शन करण्यात कमी पडला.

अक्षरच्या जागी सुंदरची निवड करण्याच्या निर्णयावर अनेक क्रिकेट पंडितांनी टीका केली. टीम इंडियाचे सहाय्यक कोच रायन टेन डोएस्केट यांना पत्रकार परिषदेत मीडियाने या निर्णयाबद्दल प्रश्न विचारला. नेदरलँड विरूद्धच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीममध्ये त्याचा समावेश होईल अशी अपेक्षा होती. पण टीम मॅनेजमेंटने नेदरलँड विरुद्धचाच विजयी संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाचे कोच काय म्हणाले?

“अक्षरच्या जागी वॉशिंग्टनला खेळवण्याचा निर्णय हा परिस्थिती, रणनिती, टीमच्या हिशोबाने घेतला होता. या निर्णयामुळे अक्षरची प्रतिमा आणि क्षमता या बद्दल अजिबात प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. तो एक मोठा मॅचविनर आहे, हे टीममध्ये सगळ्यांनाच ठाऊक आहे. मागचे दोन दिवस अंतिम 11 खेळाडू कोण असावेत? यावर आम्ही बरच विचारमंथन केलं” असं रायन टेन डोएस्केट म्हणाले. “रिंकू आम्हाला आठवा फलंदाजमधून टीममध्ये हवा होता. निर्णय त्या आधारावर घेण्यात आला. अक्षरचं स्थान आणि त्यांचं नेतृत्व टीमसाठी महत्वाचं आहे. 15 मधून अंतिम 11 खेळाडूंची निवड करणं खूप अवघड असतं” असं रायन टेन डोएस्केट म्हणाले. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढचे दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावेच लागतील.